spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

पालकमंत्री पद इतकं महत्त्वाचं का असतं? कामं काय? कोणते अधिकार?

५ डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडला. मात्र पालकमंत्री विस्ताराला मुहूर्त लागत नव्हता. पालकमंत्री पदाच वाटप कसं करायचा ह पेच मुख्यमंत्र्यांसमोर होता. अखेर पालकमंत्री पदाच वाटप शनिवारी जाहीर झालं. खरं मात्र पालकमंत्री पदाच्या निर्णयानंतर दोन जिल्ह्याच पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली आहे. एक आहे रायगड जिल्हयाच पालकमंत्रीपद आणि दुसरं आहे नाशिक जिल्ह्याच पालकमंत्रीपद या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळाव ही मागणी होती मात्र राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना पालकमंत्री पद देण्यात आल्याने भरत गोगावले समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर टायरची जाळपोळ करुन रस्ता रोको केला. त्याचप्रमाणे दादा भुसेंसहीत अन्य काही मान्यवरांना यंदा पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालेल नाही. यावरुन आता महायुतीमधील घटक पक्षांमध्ये तू-तू मैं-मैं दिसून येत आहेत. आता या दोन जिल्ह्यांचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परत आल्यावर होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्री पदाचे सर्वाधिकार असतात. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली असताना पण खात्यापेक्षा त्या त्या जिल्ह्याच पालकमंत्री पद मिळाव यासाठी मंत्री आग्रही असतात. हे पद इतकं महत्त्वाचं का असतं? पालकमंत्र्यांची कामं काय? त्यांना कोणते अधिकार असतात बघुयात या व्हिडीओच्या माध्यमातून.

पालकमंत्री कोण असतात?

पालकमंत्री या पदातच या नावातच खूप महत्त्वाचा अर्थ समाविष्ट आहे. पालकांच्या प्रमाणे, एखाद्या जिल्ह्याच्या सर्व जबाबदाऱ्यांची संपूर्ण देखभाल व निगराणी करणारी व्यक्ती म्हणजे पालकमंत्री. तो जिल्ह्यातील सर्व समस्यांची आणि विषयांची काळजी घेऊन त्यांना योग्य मार्गाने सोडवतो. त्यामुळे सामान्य भाषेत पालकमंत्री हे पद जिल्ह्याच्या संपूर्ण जबाबदारीवर असलेल्या व्यक्तीला दिले जाते. पालकमंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. तो जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यामधील एक महत्त्वाचा दुवा असतो. पालकमंत्री जिल्हा प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनाच्या माध्यमातून यशस्वीपणे अंमलबजावणी करणे हे पालकमंत्र्यांचे कार्य आहे.

पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. पालकमंत्री हे विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकाकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नियुक्त केले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्रात सध्या युती सरकारकडून 34 पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्ह्यांचं पालकत्व देण्यात आलं आहे.

अगदी थोड्यात सांगायचं झालं तर पालकमंत्री हे जिल्हाधिकाऱ्यांच्या वरचे पद असते असं म्हणता येईल. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम वेगवेगळ्या विभागांत राबवण्यापासून ते जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापर्यंत सर्व उपाय योजना करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे पालकमंत्र्यांचे मुख्य उद्दीष्ट असतं.

जबाबदाऱ्या आणि कामं काय?

जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आणि पाठिंबा देण्याबरोबरच जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काम करणे ही पालकमंत्र्यांची मुख्य जबाबदारी आहे. जिल्ह्यातील दैनंदिन कार्यकक्षेसंबंधित महत्वाची कामं, जसे की औद्योगिक क्षेत्राचा विकास, कचऱ्याची विल्हेवाट, महामार्गांचे बांधकाम, विमानतळाची उभारणी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, तसेच पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करणे आणि विविध समस्यांवर समन्वय साधणे याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखरेख ठेवणे आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.

पालकमंत्रीपद कधीपासून अस्तित्वात आले ?

राज्यघटना किंवा सरकारच्या कामकाजाच्या नियमात पालकमंत्रीपदाची तरतूद नाही. सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा म्हणून ही व्यवस्था करण्यात आली. पालकमंत्रीपद हे प्रथम महाराष्ट्रात अस्तित्वात आले. वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी असताना १९७२ नंतर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही प्रथा नंतर रूढ होत गेली. त्याला नंतर पालकमंत्री म्हणून संबोधण्यात येऊ लागले. महाराष्ट्राचा कित्ता नंतर अन्य राज्यांनी गिरविला.

सर्व राज्यांमध्ये पालकमंत्री आहेत का ?

सर्व राज्यांमध्ये पालकमंत्रीपद अस्तित्वात नाही. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, राजस्थान, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारीपदे अस्तित्वात आहेत. तेलंगणात मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी अलीकडेच पालकमंत्री नेमले आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीला त्याच जिल्ह्यातील मंत्र्याला पालकमंत्री नेमले जात नसे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षांतर्गत मतभेद असतात. अशा वेळी पालकमंत्री त्रयस्थ नेमून गटबाजी वाढणार नाही याची काँग्रेस नेतृत्वाकडून खबरदारी घेतली जात होती. कालांतराने त्याच जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्र्याची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची प्रथा रूढ झाली.

पालकमंत्र्यांमुळे वाद का निर्माण होतात ?

या आधी युती सरकार असताना एखाद्या पालकमंत्र्यांनी निधी दिला म्हणून आमदारांच्या तक्रारी पाहायला मिळतात, मात्र आता महायुती सरकारमध्ये सगळ्या पालकमंत्र्यांना आमदारांना निधी चा वाटप करताना काळजी घ्यावी लागणार आहे. नाहीतर पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या निधी वाटपाचा मुद्दा वादाचा मुद्दा बनू शकतो.

पालकमंत्री पद हे पक्षाचे जिल्ह्यावर नियंत्रण वाढवण्याचा मार्ग म्हणून पाहिले जाते. यामागील मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री हे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत विषयांशी संबंधित असल्याने त्यांचा थेट लोकांशी जवळून संबंध येतो. पालकमंत्री हे थेट लोकांशी जोडलेले आणि त्यांना जवळचे वाटणारे प्रतिनिधी असतात आणि पालकमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवतात. म्हणूनच आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या दृष्टीने हे पद मिळावं म्हणून सध्या महाराष्ट्रात दिसत आहे तशीच रस्सीखेच हे पद मिळवण्यासाठी सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss