रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादारवर कारवाई करणार का? असा सवाल कॉंग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल असे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबतचा प्रश्न सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य प्रशांत ठाकूर, विश्वजित कदम, सरोज आहिरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, वडखळ ग्रामपंचायतीच्या सर्व अंगणवाड्यांमध्ये वाटप झालेल्या घरपोच आहाराची पुनर्वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुरवठाधारकाकडून खुलासा मागवण्यात आला होता, आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, हा आहार पूर्णपणे स्वयंचलित मशीनद्वारे तयार होतो आणि उत्पादनानंतर अंगणवाडीत पोहोचण्यासाठी १५-२० दिवस लागतात. पाकिटात आढळलेले प्राणी सदृश अवशेष कोरड्या स्थितीत असणे अपेक्षित होते, मात्र ते ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडेच मृत झाले असावेत. तसेच, पूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे अशा वस्तूंची उपस्थिती असणे शक्य नाही, असे पुरवठाधारकाने स्पष्ट केले आहे.
पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.