PM Narendra Modi at Vantara in Gujarat: नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असताना, जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा केंद्राला भेट दिली. त्याचबरोबर मोदींनी १२ जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराला देखील भेट दिली. गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
वनतारामध्ये दोन हजारांहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेण्यात येते. तसेच मोदींनी विविध ठिकाणाहून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांच्या विविध प्रजातींना भेट देऊन त्यांना खायला दिले.खाजगी वनतारा केंद्रात प्राण्यांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू आणि इतर सुविधा आहेत. त्यात वन्यजीव भूल, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपी, दंतचिकित्सा, अंतर्गत औषध यासह अनेक विभाग आहेत.एशियाटीक सिंहाचे एमआरआय करताना त्यांनी पाहणी केली. याशिवाय बिबट्याच्या ऑपरेशन होत असतानाही त्यांनी उपचाराचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसोबत काही क्षण घालवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी विविध प्रजातींच्या सिंहाच्या पिल्लांशी खेळले आणि त्यांना जवळ घेतलं असून सिंहाच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळाल्या. त्यात आशियाई शावक, पांढरे सिंह शावक, कॅराकल शावक आणि ढगाळ बिबट्या शावकांचा समावेश आहे.पंतप्रधान मोदींनी विविध प्राण्यांशी जवळून संवाद साधला. त्यांनी गोल्डन टायगर आणि स्नो टायगर्सच्या समोर बसून फोटोही काढले. ते चिंपांजीसोबत खेळले आणि ओरांगउटानला प्रेमाने मिठी मारली.याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठा अजगर, एक अद्वितीय दोन डोके असलेला साप, दोन डोके असलेले कासव, तापीर, बचावलेले बिबट्याचे शावक, महाकाय ओटर, बोंगो (मृग) आणि सील देखील पाहिले.