spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

आज महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प; तीन प्रमुख घोषणांकडे सर्वांचं लक्ष

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार मांडणार आहेत. अजित पवार वर्ष २०२५- २६ चा अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला विविध आश्वासन दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पातून होते का ते पाहावं लागेल. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ 2100 रुपये देणे, शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ अश्या प्रमुख घोषणा तीन घोषणा होत्या. याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.

लाडक्या बहिणींचं अनुदान 2100 रुपये होणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 मध्ये सुरु केली होती. या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी आमचं सरकार राज्यात आल्यास 1500 रुपयांवरुन रक्कम 2100 रुपये करण्याचं आश्वासनं दिलं होतं. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न लाडक्या बहिणी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून विचारत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळं अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींचं अनुदान दरमहा 2100 रुपये होणार का याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलंय.

शेतकऱ्यांची कर्जमाफी
महायुती सरकारच्या जाहीरनाम्यातील आणखी एक प्रमुख आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांच्या थकित कर्जाची कर्जमाफी. राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय घोषणा होणार ते पाहावं लागेल.

नमो शेतकरी महासन्मानची रक्कम वाढवणार?
एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली होती. त्या योजनेतून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एका वर्षात 6000 रुपयांची रक्कम दिली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम 6000 रुपयांवरुन 9000 रुपये करणार असल्याचं म्हटलं होतं.

Latest Posts

Don't Miss