आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना २ वर्षाची कोठडी आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.
हे प्रकरण जवळपास १९९५ ते १९९७ च्या दरम्यानचे आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,”ही राजकीय केस होती. तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस राज्यमंत्री होते. त्यांचं आणि माझं वैर होते त्या वैरापोटी त्यांनी माझ्यावर केस केली होती. राकेशचा निकाल तीस वर्षानंतर आज लागला. निकाल पत्र हे मोठे आहे मी अजून वाचले नाही. ते वाचून मी आपल्याला सर्व सांगेल. नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते केलेला आहे. राजीनामाची मागणी होऊ शकते. या संदर्भात मी हाय कोर्टात जाणार आहे. न्याय मागण्याचा अधिकार नागरिक म्हणून मला आहे. वरच्या कोर्टात याबाबत न्याय मागणार आहे. हे प्रकरण ३० वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळेस मी नुकताच राजकारणात प्रवेश केलेला होता. त्यावेळेस मी आमदार होतो की नाही ते देखील मला माहिती नाही. तो काळ आणि आजचा काळामध्ये फरक आहे. नंतरच्या काळात त्यांचे आणि माझे सलोख्याचे संबंध तयार झाले. मी रीतसर या ठिकाणी जामीन घेतला आहे.”