राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी नैतिकता आणि आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे सांगितले. यांनतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार असा सवाल सगळ्यांना पडला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन समोर असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वतः कडे ठेवला आहे.
आजीत पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. यामध्ये आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची भर पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तुर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतला असून या विभागासंबंधीच्या प्रश्नांना आता ते सभागृहात उत्तर देतील. मात्र, अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खाते राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात टाकणार,याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील अंगावर काटा आणणारे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे मारेकऱ्यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताच पर्याय शिल्लक न ठेवल्याने धनंजय मुंडे यांना निमूटपणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश