Ajit Pawar: राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवारांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम दौरे रद्द केले आहेत. नाशिकमध्ये आमदार सरोज आहेर यांच्या एका कार्यक्रमाला काल (१६ फेब्रुवारी) हजेरी लावली होती. त्यावेळी भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले व ते पुण्याला आले होते. मात्र, रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना बरं वाटत नसल्यामुळं त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यामुळे पुण्यातील औंध येथील आयटीआय (ITI) मधील प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घशाचा संसर्ग झाला असल्याची माहिती आहे. रविवारी दुपारी त्रास जाणवू लागल्यानंतर अजित पवार नाशिकमधील उर्वरित कार्यक्रम रद्द करून पुण्याला रवाना झाले होते. नाशिकमध्ये उन्हाचा त्रास झाल्याने आणि ताप असल्यामुळे अजित पवारांनी पदाधिकारी बैठका रद्द केल्या होत्या, त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. आज देखील त्रास होतं असल्यामुळे अजित पवारांकडून दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधील भाषणात अजित पवारांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. आताच आपण दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाही. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या अलिकडील वाढत्या प्रकरणांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून, कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी लोकांना केले होते.पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कोंबड्यांमध्ये या आजाराच्या प्रसाराबाबतच्या चिंता दूर केल्या आणि कोंबड्यांना मारण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात सर्वाधिक जीबीएस प्रकरणे पुण्यात नोंदवली गेली आहेत. “अलीकडेच, खडकवासला धरण परिसरात (पुण्यातील) जीबीएसचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आहे. काहींनी या आजाराला दूषित पाण्याशी जोडले. तर काहींनी असा अंदाज लावला की हे कोंबडी खाल्ल्याने झाले आहे” असे पवार म्हणाले.