spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

अजित पवारांनी पियुष गोयल यांना लिहिले पत्र; पत्रात कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क…….

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी राज्यातील अनेक आमदारांनी केली होती. नितीन अर्जुन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोजताई अहिरे यांसह इतर लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल पत्र लिहिले होते. या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले.

 

पत्रात नेमकं काय लिहले आहे
राज्यात विशेष करुन नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आजमितीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतलेले आहे.

अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2400 रुपये अत्यल्प दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे.

लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. जेणेकरून लांल कांद्याचे दर टिकुन राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत चांगले दर मिळतील, असे अजित पवारांनी या पत्रात म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल

अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss