विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गट महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच बोललं जात आहे.
आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन शिर्डी येथे पार पडत आहे. या अधिवेशानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यभरात प्रमुख नेतेमंडळी शिर्डीत दाखल झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनात विचारमंथन केले जात आहे. या अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर…
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अधिवेशनात पक्षाचे ध्येय-धोरण याबाबत चर्चा होईल. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या आहेत. जिथे महायुती करू शकतो तिथे होईल. मात्र, जिथे नसेल तिथे वेगळा विचार होऊ शकतो. निवडणुकांनंतर पुन्हा महायुती म्हणून कसे एकत्र येता येईल, याबाबत अधिवेशनात चर्चा होईल. ज्या जिल्ह्यात आमचे आमदार, खासदार नाहीत. तिथले देखील लोक इथे आले आहेत. मुंबई महापालिकेत प्रत्येक वॉर्डात आमचे कार्यकर्ते आहेत. तिथे त्यांना ताकद देऊ आणि जिथे महायुती म्हणून जाणे शक्य आहे, तिथे एकत्र राहू, असे त्यांनी म्हटले आहे. तर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढायला देखील तयार आहे, असे त्यांनी म्हटले.
चंद्रशेकर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
अजित पवार गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. स्थानिक युनिट म्हणूनच आम्ही विचार करू. दाद काय बोलले? हे आम्हाला माहीत नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय करण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र महायुती म्हणून आम्ही सामोर जाणार आहोत. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे महायुती म्हणून लढू, असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती