राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनीसुद्धा यावरून मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले अनिल बोंडे?
यावेळी बोलताना ते म्हणाले, “नवनीत राणा यांच्या बाबतीत झालेली घटना अतिशय चीड आणणारी आणि संताप जनक आहे. निषेधाच्या करण्यापलीकडची ही घटना आहे. या समाजकंटकांनी, या महाविकास आघाडीच्या चमच्यांनी, या धर्मांध लोकांनी लक्षात ठेवायचं आहे की बाकीच्या लोकांनी जर संयम सोडला असता तर ते वाचले नसते. पोलिसांना सांगतो ताबडतोब सीसीटीव्ही व्हिडिओवरून, कॅमेराच्या व्हिडिओवरून त्या लोकांना अटक करा. आमचे लोक सर्व कार्यकर्त्यांसोबत जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आहे आणि मला माहित आहे संपूर्ण जनतेला या गोष्टीची चीड आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर अमरावतीत केलेले अश्लिल चाळे वर्तन ते याच लोकांचे होते, चांदुर बाजारला वासनकर कुटुंबाला केलेली मारहाण ही त्याच लोकांनी केली होती म्हणून जिल्ह्यातील जनताच यांना उत्तर देणार आहे. महाविकास आघाडी कोणीच जवळ करू शकत नाही, संपूर्ण दशहतग्रस्त लोकांना संरक्षण देतील म्हणून जनतेच्या न्यायालयात हा फैसला होणार यांना त्यांची जागा दाखवणार,” अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे महायुतीच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांची काल रात्री (शनिवार, १६ नोव्हेंबर) सभा आयोजित करण्यात आली होती. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ह्या दर्यापूर विधानसभेत विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. खल्लार पोलीस ठाण्यावर धडक देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करावी तोपर्यंत आम्ही ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका देखील घेण्यात आली होती. खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून आतापर्यंत ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना अटक करण्यात आली आहे. सभास्थळी काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने इशारे नवनीत राणांवर सुरू होते, असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच, नवनीत राणांना मारण्याच्या धमक्या, त्यांच्या अंगावर थुकण्याचा प्रयत्न, खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…