सध्या चर्चेत असलेला ‘छावा’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई तर केलीच आहे शिवाय राजकीय क्षेत्रात बरीच धुमाकूळ घालताना देखील दिसत आहे. आता नुकताच ‘छावा’ चित्रपटाचा संदर्भ देत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद पेटला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला असे विधान करत अनिल परब यांनी आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याने आता त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपनेही त्यांच्या या विधानानंतर आक्रमक भूमिका घेतली असून ते या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल परब यांच्या या वक्तव्याबद्दल निलंबन करावं अशी मागणी केली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, “अनिल परब यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजांशी केलेली आहे. त्याच्या या विकृत मानसिकतेचा आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या परबांचा आम्ही धिक्कार केला. काल सभागृहात बोलले छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय, असं बोलून त्यांनी छत्रपती महाराजांशी तुलना केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाच्या नखांशी देखील त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही शिवभक्तांनी अनिल परब यांचा धिक्कार केला. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल सभागृहात जाहीर माफी मागावी, अनिल परब याचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे.”
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार