Saturday, June 3, 2023

Latest Posts

पवार, ठाकरे, गांधी एकत्र आहेत, तोपर्यंत आघाडीला धोका नाही – छगन भुजबळ

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात १५ वर्ष सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच ते का पडले? याबाबत आत्मचिंतन करावे. जोपर्यंत काँग्रेसच्या सोनिया गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे एकत्र आहेत. तोपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. भाजप विरोधात लढण्यासाठी वज्रमूठ सारख्या जाहीर सभांमधून करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मात्र मतभेदांचे खटके उडत आहेत. विशेषतः शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर या वादाचा अधिक भडका उडाला. त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ही भाजपची बी. टीम असल्याचा’ आरोप राष्ट्रवादीवर केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीतील नेते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप’ केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या चव्हाण यांनी अशा पद्धतीचे आरोप करणे चुकीचे आहे. वेगवेगळ्या विचाराचे तीन पक्ष मिळून आघाडी स्थापन झाली. त्यामुळे थोडा वैचारिक संघर्ष होणारच आहे. तो प्रत्येक ठिकाणी सुरूच असतो, मात्र नेत्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही सुनावले. तर नुकताच डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची चर्चा आहेत. याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणीही राष्ट्रद्रोहाचा आरोप करू शकत नाही, असे मत व्यक्त केले. ‘आरएसएस’ मध्ये आहे, असे सांगून जे काही चांगले वाईट धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्यावर संघाने नजर ठेवली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान शरद पवार यांच्या राजीनामा नात्यानंतर अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षपद निर्माण केले जाईल, या वक्तव्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, तसे होईलच याबाबत सांगता येत नाही. मात्र तसे झाले तर किमान अर्धा डझन सक्षम नेते या पदासाठी पक्षामध्ये आहेत. त्यात जयंत पाटील हेही भावी कार्याध्यक्ष, असू शकतील असेही सूचक वक्तव्यदेखील भुजबळ यांनी केले.

Latest Posts

Don't Miss