भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होताच ते शिर्डीच्या साईबाबा मंदिरात नतमस्तक झाले. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी या महाअधिवेशनाला उपस्थित होते. यासाठी रवींद्र चव्हाण हे देखील शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पूर्ण विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली. साईंच्या आशीर्वादाने मी पदभार स्वीकारला आहे. सरकारकडून महाराष्ट्राची सेवा करून आणणं, हे सर्वात मोठे चॅलेंज आहे. जनतेच्या सेवेसाठी मिळालेली जबाबदारी पेलवण्याची शक्ती मिळावी, यासाठी साईचरणी नतमस्तक झालो. मी लहानपणीपासून साईबाबांचा भक्त असून वर्षानुवर्ष साईंचे दर्शन घेत असतो. त्यामुळे आज अनवाणी आलो. राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला कौल दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील जनता आमच्या बाजूने राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भाजपने आपल्या अधिवेशनाच्या मंचावर संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवली आहे. यावरून विरोधक भाजपवर निशाणा साधत आहे. याबाबत विचारले असता रवींद्र चव्हाण म्हणाले की, लोकसभेच्या वेळी फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाचा सन्मानाच केलेला आहे. वसुधैव कुटुंबकम् ची पद्धत अनुसरून आम्ही काम करतोय. योजनांच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्र फडणवीसांच्या नेतृत्वात सर्व ठिकाणी पुढे येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.