आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाची नारा दिला. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने मुंबईनंतर महत्वाचा जिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे याही उपस्थित होत्या. परंतु त्या उशिरा आल्या, त्यांच्यासाठी खुर्ची सोडावी लागली त्यामुळे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिवसेनेत कुठलीही नाराजी नसल्याचे संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, सुषमा अंधारे विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक होत्या, पण स्थानिक राजकीय गणितं न जुळल्याने त्यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं होतं. आता, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा तीच नाराजी दिसून येत आहे.
मी माझी खुर्ची त्यांना दिली
सुषमा अंधारे बैठकीला येताच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शिवसेनेच्या बैठकीतून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक सुरु होती. बैठकीतून चंद्रकांत मोकाटे हे तडकाफडकी निघून गेले. या बैठकीसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे पोहचल्यावर तिथं बसायला त्यांना जागा नव्हती, त्यामुळे मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि निघून आलो. त्या आमच्या नेत्या आहेत, त्या मंचावरचं बसणार ना? अशी खोचक प्रतिक्रिया देत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे, पुण्यातील बैठकीत सुषमा अंधारेंच्या नेतृत्वावरुन शिवसेनेत नाराजी असल्याचं पुन्हा उघड झालं आहे.
चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पुण्यात ठाकरे गटात जे काही नेते उरले आहेत, त्यातील सर्वात जेष्ठ नेते हे चंद्रकांत मोकाटे आहेत. त्यामुळे, त्यांच्या नाराजीची पुणे शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे.
स्वबळाचा नारा हा फक्त मुंबईसाठी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा हा फक्त मुंबईसाठी आहे. कारण, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, पुण्याच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बैठक सोडून गेले नाहीत, ते सुरवातीपासून बैठकीला उपस्थित होते असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
सुषमा अंधारेंची प्रताप सरनाईकांवर टीका
शिवसेना नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंचे आमदार भविष्यात शिवसेनेत येणार असल्याचे म्हटले होते. त्याअनुषंगाने सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. स्वतःच्या ताटात काय वाढून ठेवले आहे ते पाहावे. स्वतःच्या खात्यात काय होतंय ते पहा, साला तुमच्या खात्यात तिकीट दर वाढवल्याचं तुम्हाला कळत नाही, एसटी खरेदी केल्याचं कळत नाही, तुमच्या खात्यात काय निर्णय घेतले आहेत हेच तुम्हाला कळत नाही. तुमच्या ताटात काय गाढव वाढलंय ते पहा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केली.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .