आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आमदार सुरेश धस यांचा आष्टी मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकार्पणानंतर भाषणाच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषणात म्हंटले की, आपण सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणता, तसेच मला बीड जिल्हा काही वर्षांपूर्वी ‘शिवगामी देवी’ म्हणायचे. शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या कॅबिनेटचे प्रमुख आहेत. त्यामुळे नेहमीच त्यांच्याविषयी मला आदरभाव वाटतो. त्यामुळे आज मला देवेंद्र फडणवीसांना बघताना मनात वेगळाच भाव आला. तो ममत्त्वाचा भाव होता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली.
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात बाहुबली चित्रपटातील संवाद वापरले. या चित्रपटात शिवगामी देवीचे वाक्य आहे की, ‘मेरा वचनही है मेरा शासन’. त्याप्रमाणेच मी सुरेश धस यांना जाहीर वचन दिलं आहे, तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक, हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी सुरेश धस यांना अण्णा म्हणते. आम्ही तुम्हाला इज्जत देतो. यापूर्वी तुम्ही मुलाच्या लग्नाच्यावेळी मला साडी आणि पत्रिका घेऊन आला होतात. मी त्या लग्नाला आले होते. आता दुसऱ्या मुलाच्या लग्नात तुम्ही आमंत्रण दिलं तर मी नक्की येईन, नाही बोलावलं तर येणार नाही. पण आजचा कार्यक्रम हा शासकीय आहे आणि शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात कुठेही स्थान मिळाले असते तरी मी या कार्यक्रमाला आलेच असते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. पण माझंही भाग्य मोठं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘लाडकी’ वाटते, मी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आले, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार निवडून येतात, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. 2019 मध्ये सहापैकी पाच आमदार निवडून आले. आतादेखील आमच्यासोबत अजित पवार गटाचे आमदार आहेत. आम्ही मरमर करुन आमदारांना निवडून आणले आहे. देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मी मंत्री झाले, थोडंस लक आमचं आहे. मी देवेंद्र फडणवीसांना जेवढं ओळखते, तेवढं मंचावरचं कोणी ओळखत नाही. मंचावर त्यांना बाहुबली म्हटल्याने ते थोडेसे ओशाळले आहेत. पण तुम्ही काम करा, कामाने किर्तीरुपाने उरा, हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
हा जिल्हा आहे ना, जसा मोगलांना सह्याद्री कळला नाही, तसा हा बीड जिल्हा आहे. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरुन राजकारण होतं, असं बाहेर वाटतं. पण गडांवरुन राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात. पण या जिल्ह्यात कोणी व्यक्तीला कोणी पूजत नाही. या जिल्ह्यातील माणूस विकासाच्या पाठीशी उभा राहिला आहे. ज्यामुळे ज्यांच्या बाप आमदार-खासदार नाही, असे लोकही बीड जिल्ह्यात आमदार झाले आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
हे ही वाचा :
Follow Us