राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात आज (सोमवार, १८ नोव्हेंबर) संपणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागर येथील सभेत भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला होता. आता भास्कर जाधव यांनीसुद्धा त्यावरून प्रत्युत्तर दिले असून ‘भाकरी करपली ती फिरवण्याची वेळ आली आहे, असे म्हणणाऱ्या शिंदेंना सरकार बदलायचे आहे असे सांगायचे आहे. म्हणून यावेळी महाविकास आघाडीला सत्तेत आणा, असं त्यांना म्हणायचं असेल,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
भास्कर जाधव यावेळी म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आले. ते बोलताना असं म्हणाले, आंब्याच्या आडीमध्ये एक आंबा नासला तर तो पूर्ण आडी नासवतो. त्यावर पत्रकारांनी मला प्रश्न विचारले. मी त्यांना उत्तर देताना म्हंटल, त्यांनी माझं नाव घेतलं नाही. ते मला असं बोलले नाहीत. ते जेव्हा हे बोलले तेव्हा त्यांच्या बाजूला आमदार विनय नातू बसले होते. ते विनय नातू यांच्याकडे बघत बोलत होते. म्हणून मुख्यमंत्री मला नाही तर विनय नातू यांना बोलले.”
ते पुढे म्हणाले. “भाकरी करपली, भाकरी फिरवायला हवी याचा अर्थ आता जे सरकार आहे. त्याला बदलायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून एकनाथ शिंदेंना कळून चुकलं आहे. आपण शिवसेनेशी गद्दारी करून भाजपाबरोबर गेलो. भाजप हा काही विश्वासाचा पक्ष नाही. आमच्या देखत सांगतात देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होणार. त्यामुळे एकनाथ शिंदे सांगू शकत नाहीत सरकार बदला… त्यांनी तुम्हाला इशारा केला आहे कि, भाकरी करपली ती पलटा म्हणजे महायुती घालवा आणि महाविकास आघाडीचं सरकार आणा,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…