मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १३ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. तसेच प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मात्र अश्यातच उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार टीका केली आहे.
आज सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीर करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर