Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठे वक्तव्य करत महाविकास आघाडीला सल्ला दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (बुधवार, २७ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “वाईट वाटतं, हे महाराष्ट्राचे १४ कोटी जनतेचा अपमान आहे. ज्या मतदारानी मत दिली त्या मतदारांचा अपमान आहे. महाविकास आघाडी जनतेचा अपमान करत आहे. जनतेवर अविश्वास दाखवत त्याचा अपमान करत आहे. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहे, सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचं सरकार उत्तम काम करू शकतो असा जनतेचा विश्वास आहे, म्हणून जनादेश मिळाला आहे. जेव्हा लोकसभेत तुमचे एवढे खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम कशी चांगली होती? नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्येही काँग्रेसचा उमेदवार जिंकला. तिथे ईव्हीएम चांगली होती. evm मॅनेज करून आम्ही दीड हजार मतं अधिक घेऊन जिंकू शकलो नसतो का? लोकसभेच्या पराभवातून आम्ही आत्मचिंतन केलं, शिकलो, पुढे गेलो आणि जिंकलो. सध्या महाविकास आघाडी वाल्यांना झोप लागत नाही आहे, जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील.”
ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या लोकांना वाटणारच की ते मुख्यमंत्री व्हावे, तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील तुम्ही काळजी करू नका लवकरच आमचा सरकार येत आहे. काँग्रेसने मत का कमी झाले याकडे लक्ष द्यावं, महाविकास आघाडीने तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा परिक्षण करावं, डांबरटपणा करण्यापेक्षा आपली मतं का कमी झाली याचा चिंतन करा. जनतेने यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. ठाकरेंनी जेव्हा भाजपसोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता. आमचा सरकार योग्य पद्धतीने बनत आहे. आमची काळजी करण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे. मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांना वाटते की त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावे. तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार,” असे ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde पत्रकार परिषदेतून होणार व्यक्त, नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष
Eknath Shinde यांनी महायुतीपुढे टाकली नवी गुगली; म्हणाले,”मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर…”