spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

एमएमआर क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया टाईमलाईन निर्धारित करुन तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प केवळ पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसून, शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा घटक आहेत. आगामी काळात जल व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करून हे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावेत. या प्रकल्पासंदर्भात वन विभागाची मान्यता, एमएमआरडीए, सिडको आदी कार्यान्वयिन यंत्रणांनी परवाने व इतर अनुषंगिक बाबीसंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामास गती द्यावी. मुंबई महानगर क्षेत्र हे सर्वांत वेगाने वाढणार्‍या शहरी भागांपैकी एक असून, पाणीपुरवठा हा येथील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता शाई व सुसरी प्रकल्पाची कामे सुरू करण्याबाबत जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ज्याठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, तेथील पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक वापरासाठी पाणी घ्यावे. या पाण्यावर आणखी काही प्रक्रिया करता येते, का याबाबतही अभ्यास करावा. एसटीपी प्रकल्पातील पाणी औद्योगिक कारणासाठी वापर करण्यासंदर्भात मुख्य सचिव यांनी एमआयडीसी आणि नगरविकास विभाग यांची एकत्रित बैठक घ्यावी. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन जुन्या झाल्या असल्याने पाण्याची गळती होते. पाण्याची ही गळती रोखण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्याबाबत कार्यवाही करावी. वाहून जाणारे पुराचे पाणी साठवण्याबाबतही नियोजन करावे, अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

हे ही वाचा : 

Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss