Union Budget 2025: मोदी कॅबिनेट ३.० चा भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याकडून आज १ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता सादर करण्यात आला. आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली. यंदाच्या बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. याबाबत आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्यासोबतच देशातील नागरिकांचं भविष्य उज्ज्वल करणारा आहे. प्रधानमंत्री मोदी म्हणाले होते की, या देशाला विकसित करायचं असेल तर देशातल्या महिला,गरीब, युवा आणि शेतकरी वर्ग सर्वार्थाने मजबूत व्हायला हवा. आज सादर झालेला अर्थसंकल्प हेच अधोरेखित करतो, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी देशातील महिलांना खूप मोठे व्यासपीठ मोदींनी उपलब्ध करून दिले आहे ते म्हणजे लखपती दिदी. त्या अनुषंगानेच या बजेटमध्ये दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून पहिल्यांदाच उद्योजिका बनू इच्छिणाऱ्या महिलांना पाच लाख रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. तसेच एससी आणि एसटी उद्योजक घडवण्यासाठी दोन कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. महिलांना विना गॅरंटी सहज अटींवर लोन मिळेल जेणेकरून छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरू करता येईल. इतकच नाही तर महिला उद्योग वाढवण्यासाठी महिलांना डिजिटल ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजना जोडण्याची संधी दिली जाईल. सरकारच्या योजनेत महिलांना पाच वर्षांसाठी दोन कोटी रुपये टर्म लोन ची सुविधा मिळेल याचा पाच लाख महिलांना फायदा होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी महिलांच्या मनामध्ये लखपती दीदी हे स्वप्न रुजवलं आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लखपती दीदीच्या स्वप्नांना खत पाणी मिळत आहे. आपला देश जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या क्रमांकावर ती पोहोचेल तेव्हा तिथपर्यंतच्या प्रवासात महिलांचं योगदान फार मोठं असेल हे नक्की, असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
हे झालं महिलांकरिता पण एकूणच हा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांसाठी संतुष्टसंकल्प ठरला आहे. त्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स लिमिट त्यांनी सात लाखांवरून थेट बारा लाखांपर्यंत नेली आहे. त्यामुळेच १२ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना देखील कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. या इन्कम टॅक्सच्या रचनेमुळे मध्यमवर्गीय नोकरदार आणि तसेच नवतरुणांना फायदा होणार आहे. इतकंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली टीडीएस मर्यादा ५० हजाराने एक लाख करण्याचा निर्णय आहे आज घेण्यात आला. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे.अजून एक आवर्जून सांगण्यासारखा निर्णय म्हणजे कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमा श्लोक संपूर्णपणे माफ केल्यामुळे आता ही औषधे स्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांसाठी देखील हा अर्थसंकल्प प्रचंड फायद्याचा ठरला आहे. शेती क्षेत्रामध्ये १०० जिल्हे आयडेंटिफाय करून या जिल्ह्यांमध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्यात येणार आहे. शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील सरकारने घोषित केली आहे. किसान क्रेडिट कार्ड ची लिमिट पाच लाखांपर्यंत वाढवली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
हे बजेट सर्वसामान्यांना दिलासा देणारं बजेट आहे. लवकर उत्पन्न वाढावं, जनतेच्या खिशात जास्तीत जास्त पैसे असावेत या दृष्टीनेच या अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे. यामुळे विरोधक मात्र चांगलेच पेचात पडले आहेत. त्यामुळे भांबावलेल्या विरोधकांनी महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच मिळालं नाही असा अपप्रचार करायला सुरुवात केली. अर्थातच हे साफ खोटं आहे.. विरोधकांनी जर नीट अर्थसंकल्प ऐकला…वाचला तर त्यांना समजेल की कोट्यावधी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. आणि त्यामुळे मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानते. या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, युवा, गरीब आणि मध्यमवर्गीयांना आत्मविश्वास मिळाला आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, पोषण, आरोग्यापासून ते स्टार्ट अप, इनोव्हेशन, इन्व्हेस्टमेंट पर्यंत प्रत्येक क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताचा रोड मॅप आहे. शेवटी म्हणतात ना मोदी है तो सबकुछ मुमकीन है! असं म्हणत चित्रा वाघ यांनी मोदी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
हे ही वाचा :