९ मार्च रोजी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात शिवसेना उबाठा गटाचे ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. या शिबिराच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर ताशेरे ओढले. महाराष्ट्रात मी आपली सत्ता घेऊन येणार आहे आणि त्यांना सोडणार नाही. आम्ही ‘जय श्रीराम’ बोलू पण भारतीय जनता पक्षाला ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलायला भाग पाडू, असे सांगत प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यासोबतच उद्धव ठाकरे यांनी कुंभमेळ्याला न जाण्याचे कारण सुद्धा सांगितले. मोहन भागवत हे कुंभमेळ्याला गेले नाहीत. ते स्वतः कुंभमेळ्याला जात नाहीत परंतु लोकांना मात्र सांगतात. जर ते गेले नाहीत तर मी कसं जाणार? असे उद्धव ठाकरे उपहासात्मकपणे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी १० मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी भाष्य केले. सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊन दाखवावे, मग माझी बरोबरी करावी असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
Follow Us