भाजपच्या शिर्डी येथील महा अधिवेशनात प्रारंभीचे भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जनतेने अभूतपूर्व यश दिले आहे. ते शिवशाही स्थापन करण्यासाठी दिले आहे. आता युद्ध संपले आहे, विजय झाला आहे. मात्र, या विजयाने स्वराज्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे. असे ते म्हणाले.
सुमारे वीस हजार कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या महा अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढले, त्यांना काँग्रेसने पराभूत केले. ज्यांनी पराभव केला ते कोणाच्या लक्षात नाही, मात्र बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण विश्वाच्या लक्षात आहेत. त्यामुळे विजयानेच लोक तुम्हाला ओळखतील, असे नाही. ते म्हणाले की, जर आपण काही केले नाही तर लोक आपल्याला विचारतील की, त्यांनी काही केलं नाही, तुम्ही काय केले? जे काँग्रेस राष्ट्रवादीने केले नाही ते आपल्याला करायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून गडचिरोलीची जबाबदारी घेतली, याचा मला आनंद आहे. तेथील लोक नक्षलवाद सोडून आता नोकरी करत आहेत. पुढील पाच वर्षांत गडचिरोली सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा जिल्हा असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मतदारांचे आभार मानताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे. मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केले. पदाधिकाऱ्यांनी जिवाचे रान केले, म्हणून आपल्याला यश मिळाले. त्यांच्यासाठी हे अधिवेशन आहे. कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे मी अध्यक्ष म्हणून चांगलं काम करु शकलो. महाराष्ट्रात धन्यवाद मोदी जी असा कार्यक्रम घेतला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास होता. विधानसभा निवडणूक आपण ग्रामपंचायतीप्रमाणे लढलो. लोकसभेला खोटा प्रचार विरोधकांनी केला, त्याचा आपल्याला फटका बसला. त्यातून आपण खचलो नाही, तर लढलो. विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आहोत, असे अमित शाह यांनी सांगून कामाला लागा, असा आदेश दिला होता. २०१९ ला आपल्यासोबत बेईमानी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपले सरकार आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, त्यावेळी आपल्या डोळ्यात पाणी आलं होतं. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहे, असे त्यांनी म्हटले.
भाजपचे महाअधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. या महाअधिवेशनातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे. या अधिवेशनाची ‘श्रद्धा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन असून राज्यातील भाजपच्या १५ हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला.
मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, एकच प्रस्ताव आपण या अधिवेशनात घेऊन आलो आहे. तो म्हणजे तुमचे धन्यवाद, आभाराचा हा प्रस्ताव आहे. मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला. मतदारांचे अभिनंदन आणि धन्यवाद दिले पाहिजे. विरोधकांची पोपटपंची केराच्या टोपलीत मतदारांनी टाकली.विश्वविख्यात प्रवक्ते पोपटलाल म्हणत होते की, मोदी यांची हवा संपली. ३१ जुलैचे उद्धव ठाकरे यांचे भाषण विसरु शकत नाही. देवेंद्र तू राहशील किंवा मी राहील, असे ते म्हणाले. पंतप्रधानांची उरलीसुरली उतरवून टाकू असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या पक्षाने कोणाकोणाची मदत घेतली होती. शरद पवार यांच्या पक्षाचे सल्लागार गोष्टीतील गाढवाप्रमाणे झाले. ८८ टक्के स्ट्राईक देणारा आपला देवाभाऊ आहे. देवेंद्र फडणवीस व्यक्ती नाही तर शक्ती आहे, असे त्यांनी म्हटले.
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं : राधाकृष्ण विखे
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विधानसभेत मिळालेलं यश हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतिशत टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यश खेचून आणलं. राज्याचे जाणते नेते, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं, ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपण करून दाखवली आहे, असे त्यांनी म्हटले.