आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी परभणीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठात हा सर्व कार्यक्रम पार पडला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित आहेत. यावेळी नागरिकांना संबोधित करत असताना देवेंद्र फडवीस म्हणाले आहेत की, पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील (Marathwada) गोदावरी खोऱ्यात आणायचा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मागील पिढीने दुष्काळ पहिला असून, पुढील पिढीला मात्र दुष्काळ पाहू देणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. आज आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला. तसेच एक भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो, असं म्हणत नाव न घेता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. आज आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात. सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री १० वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. माझा यांना सवाल आहे. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत.” “मीही विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. वर्षानुवर्षे विरोधी पक्षात काम केलं, पण ज्यावेळी सरकारवर टीका करायचो तेव्हा चांगलं काय झालं पाहिजे हेही सांगायचो. यांच्याकडे मात्र ते सांगण्यासारखं काहीच नाही. हे कुठली दिशा असली पाहिजे हे सांगू शकत नाही. काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात प्रत्येक चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. २०१४ साली ५३ टक्के पाऊस होता. २०१८ साली ६४ टक्के पाऊस होता. आता देखील ५० टक्क्याच्या जवळपास पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्याला कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, त्याबाबत आम्ही निर्णय घेतला. त्यासाठी काही उपयोजना केल्या असून, मराठवाडा ग्रीड योजना आणली. यामुळे मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एखाद्या भागात पाऊस जास्त झाल्यास तिथून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. तसेच पुढे सरकारी योजनांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “१ रुपयात आम्ही पीक विमा योजना आणली. मला आनंद आहे की ७ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महिला भगिनींना ५० टक्के सवलत दिली आहे. ज्येष्ठांनाही एसटी फुकट झाली आहे. त्यांनाही सर्व देवदेव करण्यासाठी पाठवता येईल. हे सरकार महिलांच्या संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. महिला बचत गटाच्या मुख्यमंत्री एवढे बळ देणार आहेत की महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील. ओबीसींसाठी १० लाख घरे आपण बांधणार आहोत. देशातील एकही व्यक्ती बेघर असून नये हे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत.”
हे ही वाचा:
अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर
सरकारच्या कांदा खरेदीवर निर्णयावर स्वाभिमनी शेतकरी संघटनेची जोरदार टीका