मुंबई सह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल हा आपल्या सर्वांच्या समोर आला. आणि यामध्ये महायुतीचा दमदार असा विजय झाला. यानंतर मुख्यमंत्री कोण होणारे हे लवकरच स्पष्ट होईल असे अनेकांना वाटत होते, परंतु सध्या चालू असणाऱ्या घडामोडींमुळे काही वेगळेच निष्कर्ष समोर येत आहेत. मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबतचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही तर शिंदे यांनी माघार घेतली का किंवा त्यांनी माघार घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होणार का? याबाबतच सविस्तर जाणून घेऊया.
महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यामुळेच बहुदा एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. परंतु मग पुढे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची त्यांची भाषा देखील आता सौम्य झाल्याचं दिसून येत आहे आणि या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री पदाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
महायुतीला दमदार मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्रीपद कायम एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहावे असे अनेकांना वाटू लागले. त्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मंदिरांमध्ये महाआरती, पूजाअर्चा देखील करण्यात आली. शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली परंतु अशातच मंगळवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण केली. परंतु हे करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती आणि त्यासाठी ठाणे, मुंबईत विभाग प्रमुखांकडून कार्यकर्त्यांना वर्षा या निवासस्थानी जमण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. परंतु सोमवारी रात्री अनेक सूत्र ही फिरली आणि चित्र काहीच बदललं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी एक्स या समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांनी वर्षा किंवा अन्य ठिकाणी जमू नये असे बजावले. विधानसभा निवडणूक प्रचारक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ हा दिलेला नारा चांगलाच गाजला होता आणि त्याच धर्तीवर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने एक ‘नाथ’ है तो सेफ है असे अभियान देखील राबविले होते.
महायुतीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याने किमान दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे अशी शिंदे यांची भूमिका होती आणि शिवसेनेच्या प्रवक्तांकडून देखील मुख्यमंत्री शिंदेच व्हावे असे उघडपणे मागणी देखील वारंवार करण्यात येत होती. परंतु आता चित्र काहीसे बदलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची औपचारिकता पूर्ण केल्यावर शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर सौम्य भूमिका घेतली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व निर्णय भूमिका घेतील असे यावेळेस दीपक केसरकर यांनी सांगितले. आणि यानंतर आता एकंदरीत पाहिले तर एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होणार का या चर्चांना आता चांगलाच जोर आला आहे.
हे ही वाचा:
कर्जत-जामखेडमध्ये Ram Shinde ठरले कटाचा बळी