अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धंनजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. पत्रकार परिषद संपत आल्यावर मंत्री धंनजय मुंडे तत्काळ अजित पवार यांच्या भेटीला निघाले. त्यानंतर यांच्या भेटीत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, अंजली दमानिया यांनी बीड जिल्हा आणि येथील लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले. मात्र, त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. अंजली दमानिया यांना राजकारणात पुन्हा यायचे असेल. त्यामुळे स्वत:ची न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी अंजली दमानिया अशाप्रकारे आरोप करत आहेत का, हे बघितले पाहिजे. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत.
आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.
अंजली दमानिया यांनी आजपर्यंत अनेक लोकांवर आरोप केले. माझं मीडियाला चॅलेंज आहे की, यापैकी एकतरी आरोप टिकला आहे का? मला अंजली दमानियांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. अंजली दमानिया यांनी कृषी खात्याच्या खरेदीसंदर्भात घोटाळा झाल्याचे जे आरोप केले आहेत, ते धादांत खोटे आहेत. कृषी खात्याची खरेदी ही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आता राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना अंजली दमानिया यांना विचारुन दर ठरवायचा का? त्या बोलतील तोच दर उचित, अन्यथा उचित नाही. त्यांना विचारुन दर दिला तर ते योग्य, नाहीतर भ्रष्टाचार म्हणायचा का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आडनावाचा उल्लेख ‘बदनामिया’ असा करत त्यांची खिल्ली उडवली.
या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात निर्माण होणाऱ्या राखेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. परळी औष्णिक केंद्रात जी राख तयार होते, ती त्यांनी स्वत:च्या खर्चाने काढावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. माझ्या कंपनीत पत्नीला दिलेले पद शासकीय आहे का? ही कंपनी 2006 पासून अस्तित्त्वात आहे. या राखेमुळे बीड जिल्ह्यात सिमेंट इंडस्ट्री आली. पूर्वी राख बॅगमध्ये राहत नव्हती तेव्हा राखेची तळी असायची. आमच्या परळीत अशी दोन-चार राखेची तळी आहेत. ती साफ करायला नको का? मे महिन्यात एप्रिल महिन्यात परळी परिसर राखेमुळे धुळीत माखलेला दिसतो. ऊर्जा विभागाने म्हणावं, ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले. साप साप म्हणून भुई थोपाटणे आणि एखाद्याचे राजकीय जीवन संपवणे सोपी गोष्ट नाही. दमानियांना माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम दिले असेल त्यांना आणि दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.
अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
अंजली दमानिया यांनी कृषी खात्यात घोटाळ्याचे आरोप केले ती निविदा प्रक्रिया 2024 मध्ये राबवण्यात आली. ही प्रक्रिया नियमात बसणारी आणि शासनाच्या धोरणाला अनुसरुन राबवण्यात आली. दमानिया गेल्या 50 दिवसांपासून माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा मर्डर झाला, हा आरोप केला होता. तो देखील खोटा ठरला. अंजली दमानिया यांना असे आरोप करुन सनसनाटी निर्माण करायची आहे. या माध्यमातून त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया नियमात आणि शासनाच्या धोरणाला अनुसरुन राबवण्यात आली. माझ्या मिडिया ट्रायलचा 58 वा दिवस आहे. ही मिडिया ट्रायल कोण चालवतंय हे कळत नाही. डीबीटीच्या यादीत काय असावं किंवा नसावं, हे वगळण्याचे अधिकार नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे आहेत. या प्रक्रियेत त्याच कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. तत्कालीन अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यनेते खरेदी प्रक्रिया अंतिम करण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
अंजली दमानिया यांना शेतीची फारशी माहिती नसावी. पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करावी लागते. पेरणीच्या कामासाठी मान्सूपूर्वी तयारी करावी लागते. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता आणि जून महिन्यातील खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात सदर खरेदी प्रक्रिया पार पडली. शेतकऱ्यांना फवारणी करावी लागते, तण काढावे लागते, याची माहिती अंजली दमानिया यांना नसावी.
त्यांनी युरिया आणि एमएपी नॅनो खतासंदर्भात जे आरोप केले आहेत, ते वापरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. खतांची खरेदी करण्यात आलेली इक्को कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. याच कंपनीकडून ड्रोनच्या माध्यमातून 1 एकर शेत सात मिनिटांत फवारुन दिले जाते. दीड एकर क्षेत्रात कापसावर फवारणी करायला दोन माणसं लागतात, त्यासाठी दीड दिवस जातो. औषधासाठी 1600 रुपये खर्च येतो. मजुरी आणि पंपाचं भाडं वेगळे असते. पण नॅनो वापरुन सात मिनिटांत 1 एकर शेतात फवारणी होते, त्यामुळे वेळह वाचतो आणि याचा खर्च फक्त 600 रुपये इतका आहे. नॅनो फवारणीत फक्त 20 टक्के खत खाली पडते. त्यामुळे जमीन प्रदुषित होत नाही, खताची सबसिडी वाचते. तसेच उत्पादनही वाढते, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
Konkan Hearted Girl अंकिता प्रभू वालावलकरने नवऱ्यासह Raj Thackeray ना दिले लग्नाचे खास आमंत्रण