काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लातूर व अक्कलकोट येथे मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. देश एक आणि अखंड आहे तरीही भाजपाचे नेते बटेंगे कटेंगेचा नारा देऊन दिशाभूल करत आहेत. भाजपा आरएसएसमधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेले नाही परंतु देशाच्या एकता व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या तीन नेत्यांनी बलिदान दिले आहे. भाजपा व आरएसएस संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान मनुस्मृतीच्या तत्वावर आधारीत नाही म्हणून भाजपा आरएसएसने रामलिला मैदानात संविधान जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.
यावेळी पुढे बोलताना खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूसाला योग्य भाव मिळत नाही. नरेंद्र मोदी कृषी मालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहेत पण सोयाबीन कापसाच्या एमएसपी मध्ये वाढ करत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला 6000 रुपये प्रतिक्विंटल एमएसपी देऊ, असे सांगितले होते मात्र ते दिले नाही. भाजप सरकार दिलेली आश्वासने कधीच पाळत नाही. भाजपा युतीच्या खोटारड्या व फसव्या सरकारला सत्तेवरून उखडून टाका आणि महाविकास आघाडीचे, लोकांच्या हिताचे सरकार स्थापन करा असेही खर्गे म्हणाले.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीने पंचसुत्री कार्यक्रम दिला असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. महिलांना ३ हजार रुपये तसेच २५ लाखांचे विमा कवच दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत सहभाही होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान पुर्नस्थापित करण्यासाठी ही लढाई असून २३ तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतवर येईल आणि २०२९ साली इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी कामाला लागा असेही अमित देशमुख म्हणाले.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…