spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

CM Devendra Fadnavis यांची ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली

क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेट शिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली.

महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेट शिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. क्रिकेट या खेळावर त्यांनी अखेरपर्यंत निस्सीम प्रेम केले. त्यांच्या निधनाने एक उत्कट क्रीडाप्रेमी, क्रिकेट विषयीच्या लेखन-समीक्षणाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे चाहते, कुटुंबियांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली 

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांना अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. मी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ आणि खेळाडूंना जोडण्याचं काम केलं. क्रीडा क्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जीवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडा रसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनानं मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे ही वाचा :

Eknath Shinde यांच्या होमग्राउंडवर BJP सक्रिय होण्यास सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss