Holi 2025: महाराष्ट्रात सध्या सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळत असून, विविध जिल्ह्यांमध्ये विविध पद्धतीनी हा सण साजरा केला जात आहे. होळी म्हटलं की शिमगा आठवतो आणि शिमगा म्हटलं की कोकण. पण, ही होळी मुंबईसह अलिबाग पट्ट्यातील कोळीवाड्यांमध्येही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. कोळीवाड्यांमधील होळी… कोकणच नव्हे, मुंबईच्या कोळीवाड्यांमधील होळीसुद्धा तितकीच खास. पारंपरिकपण जपतानाच उत्सवातील उत्साह तसुभरही कमी होऊ न देता हा सण साजरा केला जात आहे. यावर्षी कोंबड हौल म्हणून प्रसिद्ध असलेल्या होलिकोत्सवाला ठाकरे उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी होळीची मनोभावे पूजा केली. मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजात होळी आणि नारळी पौर्णिमा हे दोन सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. वाईट प्रवृत्तीच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळीकडे पाहिले जाते. साधारणतः देशभरात फाल्गुन पौर्णिमेला होलिकेचे दहन करण्याची प्रथा आहे.
खुद्द आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीसुद्धा त्यांच्या वरळी मतदारसंघातील वरळी कोळीवाडा इथं जाऊन या होळीच्या उत्सवात सहभाग घेतला. उपविभाग प्रमुख हरीश वरळीकर (Harish Worlikar) कुटुंबियांसह होलिकोत्सवात सहभागी होऊन त्यांनी सर्व स्थानिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.होळीचा हा उत्साह पाहून आदित्य ठाकरेसुद्धा भारावून गेले. यावेळी त्यांनी स्थानिकांसह पारंपरिक तालावर ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे ठेका धरत असतानाच स्थानिकांनी एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं.
कोंबड हौल म्हणजे काय?
वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाच्या होळीला कोंबड हौल (होळी) असे संबोधले जाते. फार पूर्वी होळीत कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा होती, पण काळानुसार ही प्रथा बंद करण्यात आली आहे. त्या ऐवजी पुरणपोळीचा अथवा करंजीचा (पुरण्या) नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार प्रमाणे आजही या होळीला कोंबड हौल असे संबोधले जाते. कोंबड होळीला मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो. होळी लावली जाते त्या परिसरात रांगोळ्या काढल्या जातात. पताके सजवले जातात. घरात गोडधोड केले जाते. होड्यांना सजावट केली जाते, त्यांची पूजा केली जाते. कोळी महिला व पुरुष पारंपरिक वेश परिधान करून, नटूनथटून वाजतगाजत होळी आणतात. तिची पूजा करतात. गुलाल उडवतात. नवस बोलला जातो. ऊस, नारळ, फळे, ओटी, गोड पदार्थ यांचा नैवेद्य नवविवाहित जोडपे होळीला दाखवतात. मग होळीचे दर्शन घेतले जाते. रात्रीच्या वेळी होलिकेचे दहन केले जाते.
भाजपवर टीका
‘होळी हा आपला पारंपरिक सण आहे, मी दरवर्षी इथे येत असतो. तोच उत्साह तोच जल्लोष दरवर्षी इथे पाहायला मिळतो’, असं ते म्हणाले. ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांकडून कोळीवाड्यावर होळीसाठी निर्बंधांबाबतच्या वक्तव्यांवरही टीका केली. ‘यांचा स्पीकरला विरोध, यांचा पीओपीच्या गणपतीला विरोध, भाजप हिंदुत्ववादी आहे हे फेक नरेटीव लोकांच्या लक्षात येत आहे’ असं म्हणत टीका केली.
हे ही वाचा :
Suresh Dhas on Pankaja Munde: सुरेश धस-पंकजा मुंडे एकमेकांची वरिष्ठांकडे तक्रार करणार