राज्यात सगळीकडे पालकमंत्री पदाची चर्चा सुरु आहे. राज्यात ३६ जिल्हे आहेत आणि त्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ जे निर्णय घेतील तोच योग्य राहील आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडील. मात्र, माझ्याकडे आधी पालकमंत्री पद आणि जलसंधारण पद होते आणि आता माझ्याकडे पुन्हा जलसंधारण मंत्री पद कायम आहे. त्यामुळे पालकमंत्रिपद कायम राहण्याची अपेक्षा आहे. याचा वरिष्ठ निर्णय घेईलच, अशी प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, ” मंत्री झाल्यावर मी पहिल्यांदा संभाजीनगरात आलो, समाजाचे प्रेम, आशीर्वाद माझ्यावर आहे. मी पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलो तर चौथ्यांदा मंत्री झालो आहे. राजकारणात जिंदाबाद मुर्दाबाद या गोष्टी चालत असतात, जसं आपण चांगलं काम करायला जातो तेव्हा विरोधासाठी विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो, असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आले तेव्हा माझ्या समाजाने मला साथ दिली, मला सपोर्ट केला आहे, हे मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. समाजाच्या ऋणी मी राहणार आहे आणि जीवात जीव असेपर्यंत काम करणार आहे. समाजाचे अनेक प्रश्न आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा अनेक विषयांच्या संदर्भात आमचा बंजारा समाज हा सातत्याने अनेक गोष्टींपासून वंचित राहिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना या विषयासंबंधात पाठपुरावा व्हायचा, मध्ये बराच काळखंड झाला त्यामुळे मी सुद्धा विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात समाजाचे अनेक प्रश्न घेऊन काम करतो आहे.
वनआरटी स्थापन करण्याचा पाठपुरावा करून तसेच समाजाची साहित्य अकॅडमी स्थापन करण्याचा माझा प्रयत्न होता. त्यात मला यश मिळालं तसेच बंजारा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह हवेत, यासाठी मी सरकारकडे नेहमी पाठपुरावा करत होतो त्याचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात ७२ वसतिगृहाची मंजूरी मिळाली आहे. मेट्रो सिटी मुंबईमध्ये सुद्धा समाजासाठी जागा हवी यासाठी मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने आम्हाला जागा सुद्धा दिली आहे.
राजकारणात विरोध होतच असतो लोकशाही आहे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, चांगलं काम करणाऱ्याला जनता नेहमीच साथ देते त्यामुळे मी पाच वेळा सतत निवडून आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेने माझं काम पाहिलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा चांगलं काम करून शाब्बासकी मिळवण्याचा प्रयत्न माझा राहील. वरिष्ठांचा काय निर्णय होतो त्यावर सगळं काही आहे, मंत्री झाल्यावर आता कोणत्या जिल्ह्यात कोणाला पालकमंत्री पद द्यायचं हा सर्व निर्णय वरिष्ठ घेतील आणि ते योग्यच निर्णय घेतील असं मला वाटतं. मागच्या वेळेस माझ्याकडे असलेलं मंत्रीपद कायम ठेवले आहे त्यामुळे पालकमंत्रीपद सुद्धा कायमच राहील असं मला वाटतं मी जिथे पालकमंत्री होतो तिथेच राहील.
हे ही वाचा:
२६ डिसेंबरला वीर बाल दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि शौर्यगाथा
विराट आणि कोनस्टासमध्ये झटापट; भर मैदानात पाहायला मिळाला राडा