मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ११ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. तर आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही . अश्यातच ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. या सभांमध्ये राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात आताच आता रामदास आठवले यांनीही त्यांच्या कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे.
अकोल्यात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे) नेते आनंदराव अडसुळ उपस्थित होते. यावेळी बोलताना, रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर हल्लाबोल केला.
“महायुतीच्या बाजूने आम्ही हाय, कारण आमचं नाव आहे आरपीआय” असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. तुकड्या-तुकड्या विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात आठवलेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांना एकीची साद आठवले यांनी घातली आहे. आंबेडकरांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं. मी दुसरं पद घेईल. मी त्यांना मोदींकडे घेऊन जाईल. आम्ही दोघंही एकत्र येऊ, सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ, अशा मिश्किल शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलंय. “मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहे आत्ता.. मग का येणार नाही राज्यामध्ये महायुतीची सत्ता? पंतप्रधान आहे पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता” असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या सभेत रामदास आठवलेंनी कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर