spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप विरोधातील इंडिया आघाडीला स्थानिक पक्षांची मिळणार साथ

सत्ताधारी भाजपच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया (INDIA) आघाडीला महाराष्ट्रातील प्रागतिक विकास मंचाने देखील पाठिंबा दर्शवलेला आहे.

सत्ताधारी भाजपच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया (INDIA) आघाडीला महाराष्ट्रातील प्रागतिक विकास मंचाने देखील पाठिंबा दर्शवलेला आहे. स्थानिक घटक पक्षांना एकत्रित घेऊन भाजपने देशात आणि राज्यात २०१४ मध्ये जशी सत्ता स्थापन केली, त्याच पावलावर पाऊल टाकत आता इंडिया (INDIA) आघाडी प्रादेशिक घटक पक्षांना सोबत घेऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या या तिसऱ्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील कोणकोणते प्रादेशिक घटक पक्ष सहभागी होतात? हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

देशभरातील छोट्या-मोठ्या प्रादेशिक पक्ष आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन भाजप २०१४ मध्ये देशात आणि राज्यात सत्तेवर आली. तोच फॉर्मुला २०२४
साठी आता इंडिया आघाडी करू पाहत आहेत. इंडियाची तिसरी बैठक ३१ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडत आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील काही स्थानिक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीतून काही छोटे राजकीय पक्ष बाहेर पडून त्यांनी ‘प्रागतिक विकास मंच’ची स्थापना केली होती. याच प्रगतिक विकास मंचाने आता इंडियाला पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रागतिक विकास मंचात स्वाभिमानी शेतकरी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्ष हे १३ पक्ष प्रागतिक विकास मंचचे घटक पक्ष आहेत. समविचारी पक्ष म्हणून आणि भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र प्रागतिक विकास मंचाचे आयोजक राजू शेट्टी यांनी मात्र अजूनही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. “मी सुरुवातीला भाजप सोबत गेलो, त्यानंतर महाविकास आघाडीसोबत गेलो, मात्र आमच्या कोणत्याच प्रश्नावरती हे दोन्हीही पक्ष आग्रही नाहीत. त्यामुळे शेतमालाला हमीभावा संदर्भातील कायदा संसदेत पास करण्याचं आश्वासन इंडियाच्या नेत्यांनी दिल्यानंतर मी सहभागी होईल”, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

या प्रागतिक विकास मंचातील अनेक घटक पक्षांनी अनेकदा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. त्यांचे काही उमेदवारही निवडून आलेले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी या घटक पक्षांची ताकद पाहायला मिळणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे, त्यामुळे स्थानिक राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या लहान राजकीय पक्षांना एकत्रित करुन इंडियाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या तिसऱ्या बैठकीमध्ये या स्थानिक घटक पक्षांचे कोणते नेते उपस्थित राहणार? हे पाहणं महत्त्वाचं राहील. त्याचसोबत सर्वात मोठा वादाचा मुद्दा राहणार तो म्हणजे जागा वाटपांचा. याच जागा वाटपाच्या प्रश्नावर इंडियाच्या माध्यमातून कसा तोडगा काढला जाणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

हे ही वाचा:

अप्पर वर्धा प्रकल्प, नक्की काय आहे हा प्रकल्प जाणून घ्या…

Narali Purnima 2023, सण आयलाय गो-आयलाय गो नारळी पुनवेचा, नारळी पौर्णिमेला ‘या’ खास शुभेच्छा नक्की द्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss