मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नागपुरात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या स्वबळावरच्या घोषणेवर टोला लगावला आहे. संजय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलंय. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला मी कोणाला बांधील नाही. ते रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात. मी रिकामटेकडा नाही. असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुका स्वबळावर लढणार
शिवसेना ठाकरे गट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. कारण मुंबई, ठाणे, नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतोय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
इमारतीचा आढावा घेताना बोलत होते
नागपूरचे दोन्ही शासकीय मेयो आणि मेडिकल हे मेडिकल कॉलेजेस जुने आहेत. दोन्ही इमारतीला अनेक दशक झाले आहे. त्यामुळे इमारती अद्यावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आज आढावा घेतला आहे.
काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, गती वाढवण्याची आवश्यकता आहे, एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. नागपूरच्या मेयो रुग्णालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांकडून नकाशा प्रमाणे सुरू असलेले काम समजून घेतले. जो कंत्राटदार विविध विकासकामांची उभारणी करत आहे त्याच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.