आम्ही मागच्या निवडणुकीत मोठी चूक केली हे कळलं. माझी फक्त शरद पवार यांना विनंती आहे कुणाच्या ही डोक्यावर हात ठेऊ नका. आपल्याला बदला घ्यायचा आहे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांचा रोख थेटपणे तटकरे यांच्यावर होता. श्रीवर्धनमध्ये अंतुले यांचेच नाव राहिले पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले आहे.
आता रायगडच्या मातीत पुन्हा एकदा जयंत पाटील विरुद्ध सुनील तटकरे असे चित्र दिसण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी नियंत्रण मिळवले. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मविआसोबत तटकरेंविरोधात आघाडी उघडल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज पडत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते आदी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीचे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.
आपल्या भाषणात बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. जयंत पाटील यांनी म्हटले की, आज कार्यक्रमाला भावी खासदार अनंत गीते उपस्थित आहेत. मागचा वेळी आमच्या काही चुक्या झाल्या आणि त्यांच्या देखील काही चुका झाल्या. आता त्या आम्ही सांभाळून घेऊ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण बँकेत दोन वेळा आले होते. त्यांचं कायम बँकेकडे लक्ष लागून आहेत.
आज मुस्ताक अंतुले यांना बोलवलं कारण आमच्या सोबत अंतुले साहेब आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे, असेही पाटील यांनी म्हटले. हा बालेकिल्ला अंतुले यांचा आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढाया केल्या. त्यासाठी आम्ही शरद पवार यांच्या शिव्या खाल्ल्या. आता हा बालेकिल्ला कुणाचा आहे हे बोलणार नाही परंतु आगामी इंडिया आघाडी बैठकीत मी बोलणार असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले.
श्रीवर्धन मध्ये नक्कीच परिवर्तन होईल. मुस्ताक अंतुले आता पुन्हा आपल्याला वैभव उभं करायचं आहे असे सांगत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्या कन्या आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याविरोधात मुस्ताक अंतुले यांना बळ देणार असल्याचे स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी म्हटले की, आज सगळ्यात जास्त आनंद अनंत गीते यांचा चेहऱ्यावर दिसत आहे. आम्हाला मागचा निवडणुकीत कळलं की मोठी चूक केली. आमच्या वडिलांनी सांगितलं आहे की, शरद पवार यांना कधी सोडायचं नाही. माझी फक्त शरद पवार यांना विनंती आहे कुणाच्या ही डोक्यावर हात ठेऊ नका. आपल्याला बदला घ्यायचा आहे असेही त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले.
जयंत पाटील यांनी शरद पवारांसाठी कौतुकौद्गार काढले. सकाळी पाचपासून संध्याकाळी उशिरा काम करणारा आणि अनेकांना ओळखणारा नेता शरद पवार आहेत. शरद पवार यांनी पहिली कर्जमाफी केली आणि मुख्यमंत्री अंतुले यांनी दुसरी केली असल्याचेही त्यांनी म्हटले. काही लोकं उपकार केले हे विसरून जातात. त्यांना मोठं केलं हे विसरून जातात. त्यामुळे बेईमान लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका. आता काळ बदलला आहे आपण नव्याने सुरुवात केली आहे असेही पाटील यांनी म्हटले.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .