कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात त्यांना कारावास आणि दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इतिहासाची आठवण करून देत पत्र लिहिले आहे. माणिकराव कोकाटे यांना तातडीने विधानसभेतून निष्कासित करण्याची मागणी जितेंद्र आव्हाडने पत्रात केली आहे.
नेमकं काय आहे पत्रात
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याही पेक्षा निकालपत्रात न्यायालयाने नमूद केलेल्या बाबी अत्यंत गंभीर आहेत. अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी, नाशिक यांनी आपल्या निकालपत्रात म्हटलं आहे की, “आरोपी क्रमांक 1 (माणिक कोकाटे) स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा आणि त्यांना परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला गेला आणि कायद्याची अवहेलना केली गेली. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारं हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली गेली. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्ये केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे माफ करणं योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे.
राज्यात डिसेंबर 2023 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेअर घोटाळ्यात माजी मंत्री सुनिल केदार यांचा सहभाग आढल्यामुळे त्यांना अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांनी पाच वर्षे कारावास व साडेबारा लाख रुपयाचा दंड ठोठावला, त्यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या अपात्रतेची अधिसूचना काढली. न्यायालयाचा निकाल आणि अस्तित्वात असलेल्या भारतीय कायद्याचा विचार करता माणिकराव कोकाटे यांना विधानसभा सदस्यपदावरून त्वरीत निष्कासित करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्रात केली आहे.
Follow Us