सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकाच चर्चा आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळणे. त्याचसंदर्भात आज वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज प्रकरणाबाबतीत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड म्हणाले,” हा २४ सप्टेंबर २०२४ चा व्हिडीओ आहे, हे खंडणीचं प्रकरण, ही खंडणी नव्हतीच तर हा इलेक्शन फंड होता. त्या काळात इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा खंडणी आणि दादागिरीतून वसूल केला जात होता. सर्वात धक्कादायक म्हणजे यात एक पोलीस दिसत आहे, मी वारंवार आरोप करतोय की, पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हात मिळवणी आणि वाढलेली गुन्हेगारी हे सूत्र आहे, या सूत्राकडे सरकार लक्षच द्यायला तयार नाही. आता तुम्हाला यापेक्षा मोठा काय पुरावा हवाय, पोलीस, वाल्मिक कराड आणि खुनातील सर्व आरोपी एकत्र दिसतायत तरी देखील सरकार म्हणतं असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाहीत तर काय करायचं ? या सर्व गुन्ह्यांमध्ये राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस अधिकारी आहे त्याला आरोपी करा, मास्टर माईंड आणि मास्टर माईंडचा माईंड गेम सेट करणारा हा राजेश पाटील आहे. सरकारने आता योग्य तो निर्णय घ्यावा आता सरकारने कशाची वाट बघायची ?”
तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, “काल अक्षय शिंदे उघडा पडला, सरकारला जो काय रॉबिन हूड व्हायचं होत ते रॉबिन हूड उघड पडलं. अक्षय शिंदेच्या प्रकरणात संजय शिंदे नावाचा पोलीस आहे त्याला गाडीत बसवला कोणी? संजय शिंदे बरोबर चर्चा केली कोणी? ज्याने संजय शिंदे सोबत चर्चा केली तो अधिकारी कोण होता? तुम्हाला माहित नसेल तर पुढच्या आठ दिवसात मी नावं सांगतो. या अशा गोष्टींमुळे महाराष्ट्र पोलिसांची खाकीतली दादागिरी संपत चालली आहे, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात भाई, डॉन एकच, दादागिरी एकाचीच चालणार ती म्हणजे पोलिसांची जे नवीन जन्माला येत आहेत ते राजकीय हस्तक आहेत आणि या राजकीय हस्तकांसोबत आपली गणितं सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. अक्षय शिंदे, संतोष देशमुख प्रकरण हा हप्त्याचा व्हिडीओ यातून पोलीस कुठपर्यंत गुन्हेगारी करण्यापर्यंत सहभागी झालेत याचं उत्तम उदाहरण आहे, हे बंद करा नाही तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल.”
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत