Jyoti Waghmare On Uddhav Thackeray: शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप काल (२३ फेब्रुवारी) शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) नीलम गोऱ्हेंवर सनसनाटी आरोप केला. नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात. याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा सनसनाटी आरोप संजय राऊतांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. आता शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नीलम गोऱ्हेंनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्याने बीएमसीचे ‘टक्कापुरुष’ उद्धव ठाकरेंना भलताच धक्का बसला आहे, असा घणाघात ज्योती वाघमारे यांनी केला. मर्सिडिज गाडीच नव्हे तर आदुबाळाची बाबागाडीसुद्धा बीएमसीच्या टक्क्यांमधून येत होती हे खरे आहे का?, असा सवालही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. ‘गाडीच नव्हे तर ‘मातोश्री-2’ची माडी, मोठे मन नसतानाही मोठ्या काठाच्या साड्या नेसणाऱ्या वहिनींची रेशमी साडीसुद्धा पदाधिकाऱ्यांकडून खंडण्या गोळा करून घेतली जात होती हे जुन्या लोकांकडून आम्ही ऐकलंय, असं ज्योती वाघमारे यांनी सांगितले. महाराष्ट्रात ऊन वाढले की गुलाबी थंडीची मजा घ्यायला तुम्ही जाता त्या लंडनमधल्या प्रॉपर्ट्या कशा झाल्या?, हे महाराष्ट्राला सांगणार का?, वयाच्या तिशीतच कोणतीही नोकरी उद्योग न करता आदित्य ठाकरेंकडे करोडोची मालमत्ता कशी आली याचा हिशेब जनतेला देणार का?, असा प्रश्नही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला.
राणे म्हणतात तुम्ही ‘लेना’ बँक आहात, राज ठाकरे म्हणतात तुम्हाला ‘खोके’ नाही ‘कंटेनर’ लागतात. तुम्ही आणि तुमची लेकरे ज्या महागड्या परदेशी बनावटीच्या गाड्या उडवता त्या नक्की कोणाच्या नावावर आहेत याचा खुलासा करणार का? थिएटरच्या बाहेर सिनेमाच्या तिकिटं सौ दो सौ करत विकावीत तशी तिकिटांची दलाली उबाठामध्ये चालते असा आरोप अनेकांनी केलाय यातील सत्य काय ते कधी सांगणार, असंही ज्योती वाघमारे म्हणाल्या.