उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात 2 ऑगस्ट 2024 ला माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांनी वीज वापरावी, लाईट बील द्यायचं नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत ना, आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत, पुढं पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर कैलास पाटील यांनी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सवाल उपस्थित केले आहे.
महायुती सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली होती. निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटी बिलं वाटण्यात आली. निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळं लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारनं याबाबत स्पष्टता द्यावी, असं कैलास पाटील म्हणाले.
नेमकं काय म्हणाले कैलास पाटील ?
महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलं आहे. सरकारनं निवडणूक काळात मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली. खोटी बिलं वाटली. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल दिलं गेलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो पाहायला मिळतात. कैलास पाटील यांनी एका शेतकऱ्याचं वीज बिल दाखवलं, त्याला निवडणुकीपूर्वी झिरो बिल होतं. डिसेंबरचं जे बिल आलं त्यात 1 लाख 12 हजाराच्या थकबाकीसह बिल देण्यात आलं, असं कैलास पाटील म्हणाले.
एखादा शेतकरी लगेच विश्वास ठेवतो, तुम्ही विधानसभेत घोषणा केली. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिलं वाटली. आता नंतर त्यांना थकबाकीची बिलं येत असतील तर त्यांची भावना काय असेल, असं कैलास पाटील म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिलं येत आहेत. याचं सरकारनं उत्तर द्यावं. शेतकऱ्यांना चालू बिल माफ केलंय की थकबाकीसह माफ केलंय, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. मागची थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिलं कशी येत आहेत, असं कैलास पाटील म्हणाले.
निवडणुकीनंतर झिरो बिल ऐवजी शेतकऱ्यांच्या हातात थकीत वीज बिलाचा आकडा आला आहे. लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात शेतकऱ्यांचे वीज बिल घेऊन मुद्दा मांडला. थकित वीज बिल न भरल्यास मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार नसल्याच शेतकऱ्याला सांगितले जात असल्याचं कैलास पाटील यांचा म्हणणं आहे
मागील वर्षी निवडणुकीआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून झिरो बिल दिले आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कैलास पाटील यांनी निवडणुकआधी एका शेतकऱ्याला दिलेलं झिरो बिल आणि आता फेब्रुवारी महिन्यातलं बिल एक लाख 12 हजार रुपये आल्याचं दाखवलं.
नेमक काय म्हणाले होते अजित पवार?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात 2 ऑगस्ट 2024 ला माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे. तुम्हाला माहितीये आज साडे सात हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज दिली. पाच वर्षाची ऑर्डर परवा काढली. तीन वर्षांनी पुन्हा आढावा घेणार आहे. माझ्या शेतकऱ्यांनी वीज वापरावी, लाईट बील द्यायचं नाही. सा विरोधक फेक राजकारण करत आहेत. आम्ही हे सगळं करतोय समाजाच्या भल्याठी करतोय. एवढी चांगली वीज माफीची योजना विरोधक म्हणतात हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला, चुनावी जुमला, अरं कशाचा चुनावी जुमला..आम्ही शब्दाचे पक्के आहोत ना, आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत, पुढं पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं अजित पवार म्हणाले होते.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश