सरपंच संतोष देशमुख बीडमधील हत्याप्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावरुन ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. या जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात भाषणेही केली जात आहेत. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करत वाल्मिक कराड (Walmik karad) व मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, आता या जनआक्रोश मोर्चाच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चे काढले जात आहेत. तसेच, सर्वत्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे आमदार धस, अंजली दमानिया व मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध ह्या मोर्चातून आवाज उठवला जात आहे. मात्र, परभणी शहरात आज दलित कार्यकर्त्यांनी या मोर्चात लक्ष्मण हाकेंच्या (Laxman hake) हातातील माईक घेत त्यांचं भाषण थांबवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाल्मिक कराडचं समर्थन तुम्ही करत असून तुम्ही भाजपचं काम करता, असा आरोपही कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आंबेडकरी चळवळीकडून मागच्या २५ दिवसांपासून परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी धरणे आंदोलन सुरु आहे. आज याच आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले होते. मात्र, यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी हाकेंचे भाषण थांबून तुम्ही वाल्मिक कराड यांची बाजू घेता, तुम्ही भाजपचे समर्थन करत असून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. यावेळी आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी देखील हाकेंना तुम्ही चळवळीतील नेते आहात, तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेत असाल तर आम्ही तुमच्यासोबत नाहीत असा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.
लक्ष्मण हाकेंनीही शेवटी स्पष्टीकरण देत, मी भाजपचे समर्थन करणे, ना कार्यकर्ता, मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतली नाही. त्यांच्यासोबत केवळ माझेच फोटो नाहीत, तर शरद पवार, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांचाही फोटो आहेत. सर्वांना समान न्याय द्या. मी इथे सोमनाथ सूर्यवंशी यांची खाकी वर्दीकडून हत्या झालीय त्यासाठी ४५० किलोमीटर वरून सोमनाथ आणि वाकोडे साहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे, असे स्पष्टीकरण हाके यांनी दिले. त्यावेळी सचिन खरात यांनी कुणीही इथे बाहेरुन येवून राजकारण करू नये असे हाकेंना उद्देशून म्हटले.