कल्याणच्या एका मुलीवर अपहरण करून अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या वकिलाने सातत्याने धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.
कल्याणमध्ये एका मुलीवर अपहरण करून अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला अटक करण्यात आली असून त्याच्या पत्नीला देखील अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपीचा वकील संजय धनके यांना सातत्याने धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. मला सातत्याने धमकी दिली जात आहे, असं वकील संजय धनके म्हणाले आहेत. वकील संजय यांनी कल्याणच्या महात्मा फुले ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. संजय धनके यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आपण कुणाची केस लढायची याबाबत आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, असं वकील संजय धनके म्हणाले. आता याप्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्वाचं ठरलं आहे.
संजय धनके नेमकं काय म्हणाले?
मी बदलापूर अल्पवीय मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेतलं तेव्हाही मला सामाजिक कार्यकर्त्यांनी धमकी दिल्या की, वकीलपत्र घ्यायचं नाही म्हणून. शेवटी संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो. असं नाही की कुणाला वकीलपत्र देता येत नाही किंवा घेता येत नाही. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे मी वकीलपत्र टाकलं. पण काही लोकांनी धमक्या दिल्या. अक्षय शिंदे याच्या बाबतीत दिल्या. अखिलेश शुक्ला यांच्या बाबतीतही दिल्या की, मराठी माणूस असून तू असं करतोय म्हणून. अक्षय शिंदे बरोबर चार माणसं मराठी होते हेही आपल्याला नाकारता येत नाही, अशी भूमिका वकील संजय धनके यांनी मांडली.