एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, सरडे रंग बदलतात. पण एवढे फास्ट वेगाने रंग बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील. त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ठाकरेंच्या या विधानाचाही शिंदेंनी समाचार घेतला. ‘अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचं स्मारक कोण बांधतोय? सरकार बांधतंय. बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही’, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हणत उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न केले. तू राहील नाहीतर मी राहील अशी भाषा केली. अजून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली?’, असा खोचक सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.
– किशोर आपटे