काल २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ना घर का ना घाट का? अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे त्यांनी म्हटले? तसेच खुर्चीपेक्षा आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. ही शिकवण आपल्याला बाळासाहेबांनी दिली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “काल बीकेसीला सोनू निगमचा ऑर्केस्ट्रा होता. सोनू निगमच्या कार्यक्रमाला काही लोक आले होते, तिथे काही लोकांनी भाषण केली. आता ऑर्केस्ट्रामधील भाषण, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार या एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही. त्यांना असं वाटत असेल की मी हिंदुहृदयसम्राट यांच्या विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे. मुळात बाळासाहेब यांनी कोणाची लाचारी पत्करायला स्वीकारलं नाही. आज जो काही बूट चाटेपणा चालला आहे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट महाराष्ट्राचा अधपतन आणि हे उघड्या डोळ्याने पाहणारे हे लाचार राज्यकर्ते त्याच्यामध्ये हे लोक सहभागी आहेत. हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असे त्यांना वाटत असेल तर, हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेला आहे असे मी मानतो.”
पुढे ते म्हणाले,” एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाही किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे ईडी, सीबीआयच्या भितीने पळून गेलेले जयचंद आहेत. ज्याने देशाच्या शत्रूला महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचा ठरवलं. आपली कातडी वाचवण्यासाठी हे महाराष्ट्राला माहित आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं, संस्था विकत घेणे, मतदारांना विकत घेणे आणि त्यातून निवडणुका जिंकणं याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचे राजकारण म्हणायचे. मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो. बाळासाहेब यांनी दिलेला मुलाखत आणि भाषणात त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एक हमांत शिवसेना अमित शहा यांनी निर्माण केली. पूर्वी पुराणामध्ये सृष्टी आणि प्रति सृष्टी होती, ती प्रति सृष्टी काही टिकली नाही. शिर्डी आणि प्रति शिर्डी असते लोकं शिर्डीला जातात. पंढरपूर आणि प्रति पंढरपूर असत लोक पंढरपूरला जातात. विठोबा या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत. एक मातोश्रीवर होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे. बाकी सगळी आता हे कोणी देवळं बांधली असतील, ते तात्पुरती आहेत. एकनाथ शिंदे यांचे प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये, त्यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाचा वास सोडावा. स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते उद्या तेही राहणार नाहीत. तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळत आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. एका राजाला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा :