मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. कोल्हापुरात मराठा समाज संघटनांची बैठक पार पडली, या बैठकीला मराठा समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पुन्हा एकदा सरकारला इशारा देण्यात आला आहे. लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात सरकारसोबत चर्चेला प्राधान्य दिलं जाईल, मात्र दखल न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग मोकळा असेल, असा इशारा यावेळी आंदोलक सुरेश पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि आमचं आंदोलन एकच असेल, मात्र आरक्षणाशिवाय अन्य काही मागण्या आम्ही करणार आहोत, मागण्या सरकारनं मान्य केल्याच पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलक ज्योती मेटे यांनी दिली आहे.
सरकारची डोकेदुखी वाढणार?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र तरी देखील हा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून या मागणीला मोठा विरोध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा गुंता वाढला आहे. आता मराठा समाजानं पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात आंदोलन करू असं म्हटलं आहे. तसेच रस्त्यावर देखील उतरू असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.