भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा, हिंदुत्ववादी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज सांगली दौऱ्यावर आहे. आज सांगलीत त्यांच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणेंच्या भाषणातील आक्रमकता आणि एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून ते बोलत असल्याचं पाहायला मिळालं आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर एखाद्या पक्षाच्या नेत्याप्रमाणे किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल, असे भाषण त्यांनी टाळावे, असा सूर विरोधकांकडून उमटत आहे. मात्र आज सांगितली आपल्या भाषणात भाषणात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावर भर दिला आहे. तसेच, ईव्हीएममुळे महायुतीचा विजय झाला अशी टीका करणाऱ्या विरोधकांना ईव्हीएमचा वेगळाच अर्थ सांगितला आहे. तसेच, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनाही टोला लगावला.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे
विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतात, ईव्हीएमला दोष देतात. पण विधानसभेला आम्ही तिकडे ईव्हीएमवरच निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला, असा फुलफॉर्म नितेश राणेनी सांगितला. ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, आम्हालाही विशाळगडावर 12 तारखेला कसा उरूस होतो हे बघायचंच आहे, असे म्हणत 12 जानेवारीला विशाळ गडावर उरुस निघू देणार नसल्याचं राणेंनी म्हटलं.
पुढे ते बोलले, सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरु आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणं गरजेचं होतं. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणूनच, माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले, असे म्हणत नितेश राणेंनी विशाल पाटील यांनाही लक्ष्य केलं. जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, अशा शब्दात राणेंनी भाषणातून आपली भूमिका मांडली.
विशाळ गडावर उरूस, नितेश राणेंनी सांगितला कायदा
12 तारखेला विशाळ गडावर उरुस काढण्याचं नियोजन आहे. विशाळ गडावर काही महिन्यांपूर्वी काय घडलंय हे आपणा सर्वांना माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलीय. पण, हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेनुसार 12 तारखेला कोणीही विशाळगडावर कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचं काम करु नये. हिंदू समजाने संयमाने घेतलं असताना इतर समाजानेही संयमाने घ्यावे, उगच कोणालाही चिथावण्याचे काम करु नये, उरुस काढून कोणालाही चिथावण्या प्रकार करू नये. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेऊन आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटलंय.