संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १२ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज ८ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतील गुहागर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
रस्त्यावर खड्डा दिसला तर खड्ड्यात उभं करून मारेन, असा दम दिल्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण झाले. कोकणातील रस्ता इतका खराब आहे पण त्यावर कोणीच काही बोलत नाही. सर्वांना पुढे घेऊन जाऊ शकतो आपण, इतकी ताकद कोंकणात आहे. त्याच-त्याच लोकांना मतदान करू नका. त्यांनाच निवडून देऊ नका, तुमची प्रगती होणार नाही. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्याहातून घडावा, हीच माझी इच्छा! माझ्या हाती सत्ता द्या, आपण चमत्कार घडवून आणू.