बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव निर्माण होत आहे. आता भाजपच्या नेत्यांनाही बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. आपण फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात हे बोललो होतो, चंद्रपूरमध्ये हळूहळू गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. अधिकाऱ्यांशी बोलताना चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाल्याचा दावा त्यांनी केला. तर सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा पूर्णतः फेटाळला नाही. आपण फक्त एका घटनेच्या संदर्भात बोललो होतो असं ते म्हणाले. भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीडची परिस्थिती किती भयंकर असल्याचं वाटतंय हे दिसून येतंय असं वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपुरातील गुन्हेगारी वाढू नयते यासाठी सूचना
सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जी घटना एका सरपंचासोबत घडली ती अमानवी होती. मानवतेला लाज वाटणारी तशी घटना चंद्रपूरमध्ये घडता कामा नये. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये हळूहळू कोल माफिया आणि वाळू माफियांची संख्या वाढताना दिसतेय. पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून त्याची माहिती समोर आली त्यावेळी त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज जर या माफियांना अटकाव केला नाही तर उद्या त्याचा परिणाम वाईट होईल.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “बीडच्या एका घटनेबद्दल मी बोललो. आपण ज्यावेळी बिहार म्हणतो त्यावेळी बिहारच्या सगळ्याच गावात तशा घटना घडतात का? सरसकट अशा घटना घडत नाहीत. तशाच अर्थाने बीड जिल्हा बदनाम आहे असं नाही. माझ्या वक्तव्यामध्ये तसा कोणताही संदर्भ नाही. वडेट्टीवार काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मी कोणत्या अर्थाने बोललो त्याबद्दल मला माहिती आहे.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?