spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

माझं पांघरून आणि पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य

आज अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक बीड येथे पार पडत आहे. बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये बैठक पार पडत आहे. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रोखतेक भाषण करताना पक्षात आणि बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत, असा थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च करता मग आपल्या भागातील विकासकामांसाठी तशी भावना तुमच्या मनात का नाही? विकासकामे करताना आपल्या भागाबद्दल तुमच्या मनात आपलेपणा का नाही? आता सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे येऊन मला भेटतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हे लोक दुसऱ्याच पक्षात होते. मात्र, आता येऊन सांगत आहेत की, दादा मी तुमच्यासोबतच आहे. हे असं चालणार नाही. मी काही दिवस तुमचं वागणं-बोलणं बघेन. प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे. हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलंय. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्यात. तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन. पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात विकासकामे करताना पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली जाईल. सगळ्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवा. लोकं बोलली पाहिजेत, हे लोक खरंच व्यवस्थित पद्धतीने काम करत आहेत. आपल्याला कोणाचा अवमान करायचा नाही. पण विकासकामे करताना फक्त पुढाऱ्यांना विचारुन होत नाही. जनतेशी आणि समाजाशी संबंध असणाऱ्या लोकांना विचारले पाहिजे, आपल्या भागातील साहित्यिक, विचारवंत आणि पत्रकारांचे म्हणणे लक्षात घेतले पाहिजे. मी काम करताना कोणताही भेदभाव करणार नाही. मात्र, इतरांनी तो केला तर मी खपवून घ्यायला साधूसंत नाही. तुम्ही दुटप्पी वागणार असाल तर मी काम करणार नाही. मी सरळमार्गी आहे, सगळ्यांना मदत करेन. आम्ही इकडे विटू-दांडू, गोट्या किंवा पतंग खेळायला आलेलो नाही, आम्ही इकडे काम करायला आलेलो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

विधीतज्ज्ञांच्या घडवणुकीसाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss