राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या प्रचाराचा धडाका सुरु असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नाना पटोले बोलत होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ जिंकली तर दिल्लीतील नरेंद्र मोदींची सत्ताही जाईल.”
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमीभाव देऊ तसेच सत्तेत आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करेन असे आश्वासन दिले होते पण सत्तेत येतात नरेंद्र मोदींनी ते सर्व चुनावी जुमले होते असे सांगत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आता देवेंद्र फडणवीस मोदींसारखेच शेतकऱ्यांना आश्वासन देत, सत्तेत आलो तर शेतमालाला हमीभाव देण्याची भाषा करत आहेत. ११ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, मागील ७.५ वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, याकाळात त्यांनी केले, हे आधी सांगावे, बळीराजाला खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपाच्या या थापेबाजाली बळी पडणार नाही,” असे पटोले म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “विधानसभेची ही निवडणूक महत्वाची आहे, महाराष्ट्राला भाजपायुती सरकारने संकटात लोटले असून शिंदे, फडणवीस व अजित पवार यांनी दिल्लीत बसलेल्या मोदी, शाह यांना महाराष्ट्र लुटून देण्याचे पाप केले आहे, महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भाजपा युती सरकारने भ्रष्टाचार करून शिवाजी महाराज व कोट्यवधी शिवप्रेमींचा अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांने यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये कुणबी समाजाचा कुत्रे म्हणून अपमान केला. अशा मनुवादी प्रवृत्तींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे.”
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंनी दिला सभेला नकार, उमेदवाराचा ब्लडप्रेशर वाढून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल