spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

काँग्रेस संपली म्हणणाऱ्या मोदींच्या भाषणात ५० वेळा काँग्रेसचा जप, Nana Patole यांचा PM Narendra Modi यांच्यावर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर असून धुळे आणि नाशिक जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला. आता यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला.

“विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पराभवाची चाहूल लागल्यानेच जाती व धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाचीच संस्कृती आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले असून नरेंद्र मोदींनी त्याचे खापर काँग्रेसवर फोडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत जाती धर्माच्या नावावर माथी भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा मोदी-शाह यांचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता खपून घेणार नाही,” असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

लोकांना नक्षलवादी ठरवण्याचे पाप भाजपाने केले

ते पुढे म्हणाले की, “राहुल गांधी हे लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई लढत असताना त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार हा संविधानाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व संविधानाचा अपमान भारतीय जनता पक्षाने सातत्याने केला आहे. लोकशाही व संविधान वाचवणाऱ्या लोकांना नक्षलवादी ठरवण्याचे पाप भाजपाने केले आहे.

ओबीसी समाजाबद्दल नरेंद्र मोदींचे ‘पुतणा मावशीचे प्रेम’

काँग्रेसने जाती जातीत भांडणे लावली, ओबीसींतील जातीत भांडणे लावली ओबीसींना आरक्षण दिले नाही या नरेंद्र मोदींच्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, “ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता, हे देशातील जनतेला माहित आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपानेच घालवले. महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, हलबा समाजामध्ये भाडंणे लावण्याचे पाप भाजापानेच केले आहे. सरकारी कंपन्या विकून नोकऱ्यातील आरक्षण संपवण्याचे पाप भाजपानेच केले आहे. युपीएससीची परीक्षा न घेता आरएसएसच्या विचारणीच्या तरुणांना थेट संयुक्त सचिव पदावर नियुक्ती देऊन एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या मुलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे पाप मोदी सरकारनेच केले आहे. दोन दिवसांपूर्वीच यवतमाळच्या वणी येथे भाजपच्या एका पदाधिका-याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते पण कुणीही त्याला थांबवले नाही. ओबीसी समाजाबद्दल नरेंद्र मोदींनी दाखवलेला कळवळा हे फक्त ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे.”

मोदींनी ५० – ६० वेळा काँग्रेस नावाचा जप भाषणात केला

ते पुढे म्हणाले, “‘बटेंगे तो कटेंगे’, सारखी नारेबाजी करून महाराष्ट्रात धार्मिक उत्पात घडवायचा भाजपाचा प्रयत्न आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाबद्दलची भाजपाची भूमिका पाहता भाजपा या समाजाला देशाचे नागरिक समजत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्ष आता राष्ट्रीय राहिला नसून प्रत्येक राज्यात दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घेत आहे हा नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकारच चंद्रबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या कुबड्यावर उभे आहे. महाराष्ट्रातील सरकार बनवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्यांच्या कुबड्यावर सरकार बनवले, हे देशाच्या पंतप्रधानाना माहित नाही का? काँग्रेस संपली आहे असे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाषणात ५० – ६० वेळा काँग्रेस नावाचा जप केला. नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे नेहमी प्रमाणे खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता पण महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही,” असेही नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

PM Narendra Modi LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Narendra Modi LIVE: लाडकी बहिन योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss