Wednesday, April 24, 2024

Latest Posts

अहमदनगर येथे वर्धापन दिनानिमित्त होणारी राष्ट्रवादीची सभा ढकलली पुढे, अजित पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दिनांक ९ जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दिनांक ९ जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान होत आहे. यावर सरकारने मदत करा अशा फक्त स्टँडींग ऑर्डर दिल्या आहेत. परंतु मदत होत नाहीय किंवा शेतकऱ्यांना मदत मिळालेली पहायला मिळाली नाही. सरकारने एक हजार ८० कोटी रुपये कारखान्यांना मंजूर केले होते परंतु त्यातून कॅबिनेटने फक्त पाच कारखान्यांना साडे पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे यांचा संबंधित कारखाना, हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कारखान्यांना ही मदत जाहीर केली आहे. बाकीच्या कारखान्यांना मात्र राजकीय नजरेने बघून चालत नसते परंतु हे सरकार ‘हम करेसो कायदा’ यापध्दतीने काम करत आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला. टोमॅटो, कांदा, कापूस यांचे भाव पडल्याने विशेषतः नाशिकमधील कांदा व टोमॅटो पिकवणारा शेतकरी उत्पादक हवालदिल झाला आहे. त्यांना हा भाव अजिबात परवडत नाहीय. अधिवेशन काळात सभागृहात अनुदान देण्याबाबत जो निर्णय झाला त्या निर्णयाचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोचले नाहीत. मध्यंतरी कापसाचे भाव चांगले झाल्याने विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवला कारण अजून भाव वाढेल म्हणून शेतकऱ्यांना अपेक्षा असते भाव वाढले तर कुटुंबाला मदत होऊन आर्थिक घडी नीट बसेल. परंतु आता वाढलेले भाव कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कापूस केंद्रे शेतकऱ्यांना कापसाचा भाव पाडून मागत आहेत. मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी जोरदार टीकाही अजित पवार यांनी केली.

आताच्या वादळात केळीच्या बागा व इतर फळबागांचे नुकसान होत आहे. ग्लोबल वॉर्मिगचे संकट घोंघावत आहे. या राज्याचा अर्थमंत्री असताना माझं तर स्वतः चं मत आहे की अर्थ संकल्प सादर करत असताना जे कुणी अर्थमंत्री असतील त्यांनी एनडीआरएफ एसडीआरएफ मधून मदत होतच असते त्याचे नियम ठरलेले असतात परंतु तेवढ्या नियमांमध्ये त्या राज्यातील बळीराजाचे, शेतकऱ्यांचे भागत नसते त्यांना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ताठ मानेने उभं करायचं झालं तर त्यासाठी राज्यसरकारची मदत देखील त्यांच्या पाठीशी उभी करावी लागते. अर्थसंकल्प सादर करत असताना या कामाकरता बजेटमध्ये निधीची वेगळी तरतूद करण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. आमच्या महाविकास आघाडीमध्ये असणार्‍या तिन्ही पक्ष ४८ जागांची चाचपणी करत आहेत. चाचपणी करण्याचा अधिकार आहे असेही अजित पवार म्हणाले. लवकरच पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणूका जाहीर होण्याअगोदर जागा कुणी लढवायच्या यावर चर्चा होईल. चंद्रपूर तर कॉंग्रेसची आहे आणि पुणे जागेबद्दल कॉंग्रेसचे वेगळे मत आहे, आमचेही वेगळे मत आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू असेही अजित पवार म्हणाले. सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्याप्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे असा थेट आरोप अजित पवार यांनी केला.

मी हे राजकीय हेतूने बोलत नाही हे सांगतानाच दोन तरुणी चर्चा करत आहेत. शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. त्यापासून शेतकरी बेरोजगारांना लाभ मिळतो त्यासंबंधीचे कागदपत्रे एकाच ठिकाणी एक खिडकीवर मिळणार आहे. वास्तविक ही योजना स्वर्गीय अंतुलेसाहेबांनी त्यांच्या काळात सुरू केली. त्यावेळेपासून अनेक राज्यकर्ते आले परंतु कुणीही ती योजना बंद केली नाही. ती योजना गोरगरीब निराधारांच्या फायद्याची होती उलट त्यात प्रत्येकवेळी रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता ही योजना फक्त ६५ वर्षावरील लोकांना याचा लाभ मिळतो. त्यामध्ये विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, तृतीयपंथी यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखवल्यानंतरच त्या योजनेचा फायदा मिळतो आणि इथे शासनाच्या जाहिरातीत दोन मुली चर्चा करत आहेत.काय चाललंय आहे. इतकं धादांत खोटं… त्या दोघांनी (शिंदे – फडणवीस) बसावं आणि आपली जाहिरात नीट येते का नीट दाखवतात का हे तरी बघावं असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लगावला. दुसर्‍या जाहिरातीबाबत बोलताना चार – पाच सुशिक्षित तरुण चर्चा करत आहेत ‘आम्हाला शिकून नोकर्‍या नाहीत’ त्यात एक क्रिकेटपटू चेंडू त्यांच्याकडे भिरकावतो आणि त्यांच्यामध्ये येऊन विचारपूस करतो ‘तुम्हाला रोजगार आहे?’ शासनाची रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळू शकते. शासनाची रोजगार हमी योजना कुणाकरता आहे. याचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांची सटकली आहे. असा जोरदार हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

या सुशिक्षित तरुणांना रोजगार हमीची कामे देणार आहे का अशी विचारणा करतानाच एका ठिकाणी तर सर्व योजनांची कागदपत्रे देणार त्याचे नाव ‘शासन आपल्या दारी’ या जाहिरातींची चेष्टा व्हायला लागली आहे. मुख्यमंत्री हे ठाणे शहरातून आलेले आहेत. त्यांना क्लस्टर, समृद्धी, टीडीआर, एफएसआयबद्दल माहिती असेल त्याबद्दल दुमत नाही ते सातारा येथून आले तरी त्यांचे सगळे आयुष्य ठाण्यात गेले आहे मात्र उपमुख्यमंत्री यांना या सगळ्या योजनांची माहिती असूनही अक्षरशः शेकडो कोटी रुपये खर्च करून या खोट्या जाहिरात दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि महाराष्ट्रातील जनतेला फसवण्याचे धंदा यांचा सुरू आहे असा थेट आरोपही अजित पवार यांनी केला. वनविभागाच्या बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सध्या चालू आहेत. वास्तविक अधिकारी सांगत आहेत आम्हाला अधिकार जरी असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील आदेश पाळावेत असे तोंडी आदेश असल्याचे सांगत आहेत. काहीजण परदेशात गेले आहेत. बदल्या होणे आणि यांनी परदेशात जाणं हा योगायोग आहे का हा एक संशोधनाचा भाग आहे असा टोला लगावतानाच माजी खासदार राजू शेट्टी यांनीसुध्दा रेटकार्ड मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवले होते तर दुसरीकडे जिल्हाधिकारी बदल्यांचा रेट किती आहे यात कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकारी यांच्या बदल्या सांगितल्या तर बदल्या होणार हा ठराविक आमदारांना अधिकार दिला आहे. कृषी सहायक पदासाठी रेट तीन लाख रुपये असे प्रसारमाध्यमातून छापून आले आहे. लाखो करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसे करु शकतील. शासन आपल्या दारी आणले आणि शासनाला कुठे नेले तरीदेखील शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता ही बदलल्याशिवाय ‘शासन आपल्या दारी’ ही फसवणूक चालली आहे ती थांबणार नाही असा थेट हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

मोफत एसटी प्रवास हीदखील फसवणूक आहे. अलीकडे खुर्च्या मोकळया होतात म्हणून योजनांच्या लाभार्थ्यांना बोलावले जाते न आल्यास त्यांना योजनांचा लाभ बंद करतो असे सांगून गर्दी जमवली जाते. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हे सरकार असं का करत आहे, कशासाठी करत आहे, कोण यांना हे सगळे करायला भाग पाडत आहे की, यांच्याच स्वतःच्या मनात कल्पना आली की, कुणी त्यांना तुम्हाला यश संपादन करायचे असेल तर जाहिरातीबाजी करा सांगितले. यामुळे हे सरकार बदनाम होत आहे ही बदनामी थांबवण्यासाठी कुणी प्रयत्न करत नाही परंतु हे सरकार बदला अशीच मानसिकता सध्या दिसत आहे असेही अजित पवार म्हणाले. एकाने जरी मी अर्थमंत्री असताना पैसे घेतले असे सांगितले तर मी राजकारण सोडेन आणि कृपाल तुमाने यांनी सिद्ध करून दाखवावे आणि नाही सिध्द करुन दाखवलं तर त्याने घरी बसायची तयारी ठेवावी असा सज्जड इशारा अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिला. हे असले आरोप माझ्यावर करायचे नाही. खाजगीत कुणालाही विचारा माझ्या कामाची पद्धत कशी आहे ती… उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला… त्याने एक तरी माणूस उभा करावा माझ्यासमोर अजित पवारांना पैसे दिल्यावर काम झाले सांगणारा असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी खासदार कृपाल तुमाने यांना दिले.

हे ही वाचा:

Odisha Train Accident नंतर हजारो लोकांनी रेल्वे तिकिटे रद्द केली?

तुम्ही APPLE JILEBI कधी खाल्ली आहे का? ‘ही’ खास रेसिपी तुमच्यासाठी

Adipurush चित्रपट रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, प्रत्येक थिएटरमध्ये…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss