१८ जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. आता पालकमंत्र्यांच्या पदावरून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावरून रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांचे मत मांडले आहे.
काय आहे रोहित पवार यांची एक्स पोस्ट?
या सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशीच काहीशी स्थिती आहे. तिन्ही पक्षांना त्यांना स्वतःला अनपेक्षित बहुमत मिळूनही निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी १२ दिवसांनी, मंत्रिमंडळ विस्तार २२ दिवसांनी, खातेवाटप ३० दिवसांनी तर पालकमंत्री वाटप तब्बल दोन महिन्यांनी झाले. त्यातही आता रायगड, नाशिकच्या पालकमंत्री वाटपावरून वाद निर्माण झाल्याने २४ तासाच्या आत सरकारला नवीन GR काढावा लागला. सरकारमध्ये एकीकडे कोण आंदोलन करतंय तर कोण नाराज होऊन गावाला जातंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला सुद्धा एकत्र जात नाहीत. शिवाय उद्योगमंत्र्यांची दावोसची हॉटेल रूमसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने बुक केली. एवढी टोकाची अनागोंदी आणि अविश्वास या सरकारमध्ये आहे. आज सरकार स्थापन होऊन ४६ दिवस झालेत पण जनतेला सरकार किंवा मंत्र्याची कामे कुठेही दिसत नाहीत परंतु गुन्हेगारी मात्र सर्वत्र वेगाने वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रु, युवांना रोजगार या आश्वासनांचा सरकारला बहुधा विसर पडला असावा. या सगळ्या अविश्वासू वातावरणात आपसातले हेवेदावे बाजूला सारून सरकारने जनहिताची कामे करावीत, ही लोकांची अपेक्षा सरकार पूर्ण करेल की नाही, हा आज प्रश्नच आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थगिती देईल असं वाटायला लागलं आहे. काय सावळा गोंधळ सुरु आहे, काय ड्रामा सुरु आहे, एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले, सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राने शर्मेने मान खाली घालावी अशी स्पर्धा सुरू आहे. ‘भांडा सौख्यभरे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती